आमगाव वनपरिक्षेत्रात १० हेक्टर वनजमीन अतिक्रमणमुक्त; ठाणा येथे वनविभागाचा मोठा हातोडा!
संरक्षित व झुडपी जंगलातील अनधिकृत शेती उद्ध्वस्त : १३ अतिक्रमणधारकांवर कारवाई
आमगाव (गोंदिया) : वनजमिनीचे संरक्षण आणि नैसर्गिक जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आमगाव प्रादेशिक वनपरिक्षेत्राने धडक मोहीम राबवून मौजा ठाणा येथील सुमारे १० हेक्टर (२५ एकर) वनजमीन अतिक्रमणमुक्त केली. संरक्षित वनक्षेत्र आणि झुडपी जंगलाच्या जमिनीवर अनधिकृतपणे वाफे तयार करून शेती करणाऱ्या १३ अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के. आकरे यांच्या नेतृत्वाखाली १० ऑक्टोबर रोजी सलग ७ तास ही निष्कासन मोहीम राबविण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, ठाणा येथील संरक्षित वन कक्ष क्रमांक ४७८ व ११४१ (जुना गट क्रमांक ४९८) तसेच कक्ष क्रमांक ११४१ मधील झुडपी जंगलाच्या मोकळ्या भूखंडावर स्थानिक काही व्यक्तींनी अनधिकृत ताबा मिळवला होता. वनजमिनीचे मूळ स्वरूप बदलून तेथे शेती व इतर कारणांसाठी सपाटीकरण करण्यात आले होते. यामुळे परिसरातील नैसर्गिक संपदा व जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला होता. वनविभागाने संबंधित अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याबाबत रीतसर नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, मुदत संपूनही त्यांनी ताबा न सोडल्याने अखेर प्रशासनाने थेट निष्कासनाची कारवाई सुरू केली.सलग ७ तास चालली धडक मोहीम१० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) एस. के. आकरे यांच्या नेतृत्वात वनकर्मचारी, शीघ्र कृती दल (RRT), आमगाव व अंजोरा येथील क्षेत्र सहायक, वनरक्षक आणि मजुरांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पिकांचे तयार केलेले बांध व वाफे उद्ध्वस्त केले. मोहीम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कुणी अतिक्रमण करू नये, यासाठी तातडीने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने जमिनीच्या सीमेवर खोल ‘टीसीएम’ (TCM) चर खोदण्यात आले.या १३ अतिक्रमणधारकांवर झाली कारवाई :वनविभागाने दिलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ठाणा (ता. आमगाव) येथील रहिवासी संजू बिसेन (वय ३५), कमलाप्रसाद राऊत (वय ४९), शिवानंद बिसेन (वय ५२), धर्मेंद्र बिसेन (वय ३४), यशवंत येळे (वय ५०), प्रल्हाद ठाकरे (वय ६०), मनोज बिसेन (वय २४), गंगाराम देशकर (वय ६५), बाबुलाल बनकर (वय ४५), मधुकर बनकर (वय ५३), सुरेश बघेले (वय ६०), आत्माराम गाते (वय ४५) आणि सुभाष बनकर (वय ३५) या १३ जणांच्या ताब्यातील अतिक्रमण हटवून जमीन वनविभागाने ताब्यात घेतली आहे.या यशस्वी मोहिमेत ठाणा गावचे पोलीस पाटील प्रदीप गंगाराम भेलावे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष चंद्रकुमार रूपचंद भेलावे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत बिसेन, सदस्य सुरेश ठाकरे आणि स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य केले. तसेच बिरसी बीटचे वनरक्षक व्ही. पी. परिहार यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. वनक्षेत्रावर कोणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा वनविभागाने दिला आहे.

