एटापल्ली तालुक्यात खळबळ: ग्राम कोस समितीच्या ठरावासाठी आर्थिक प्रलोभनांचा आरोप?
‘ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड’च्या नावाखाली दलालांकडून हालचाली;
चौकशीची ग्रामस्थांची मागणी! तहसीलदारांना दिले निवेदन
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील जावेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध ग्राम कोस समित्यांचे ठराव बेकायदेशीररित्या मिळविण्यासाठी काही दलालांकडून आर्थिक प्रलोभने दाखविली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी एटापल्लीच्या तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या नावाखाली काही मध्यस्थ व दलाल सक्रिय झाले आहेत. हे व्यक्ती ग्राम कोस समितीच्या मोजक्या सदस्यांना हाताशी धरून, त्यांना विविध आर्थिक आमिषे व लालच दाखवून कंपनीच्या हिताचे ठराव मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रकार लक्षात येताच सुज्ञ ग्रामस्थांनी एकत्र येत थेट प्रशासनाचे दार ठोठावले आहे.
गावाच्या हिताशी तडजोड; नियमबाह्य पद्धतीमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी
गावाच्या विकासाशी आणि हिताशी संबंधित कोणताही निर्णय हा ग्रामसभा व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत, अत्यंत पारदर्शक व कायदेशीर प्रक्रियेनुसार होणे बंधनकारक आहे. मात्र, येथे ग्रामसभा व ग्राम कोस समितीची दिशाभूल करून काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी नियमबाह्य पद्धतीने ठराव लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची दाट शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या गुप्त हालचालींमुळे सध्या जावेली खुर्द ग्रामपंचायत परिसरातील गावांमध्ये तीव्र नाराजीचे व संतापाचे वातावरण आहे.
निष्पक्ष चौकशी करून अधिकारांचे संरक्षण करा!
जावेली खुर्द अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनात, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी केली आहे. तसेच, ग्रामसभा व ग्राम कोस समितीच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करून कोणताही बेकायदेशीर ठराव मंजूर होणार नाही, याची प्रशासनाने चोख दक्षता घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
प्रशासनाला निवेदन सादर करताना गावातील प्रमुख नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने: सैनू लेकामी, नामदेव लेकामी, तनेश गोटा, नामसू हिचामी, बिरसा हेडो, मधुकर मट्टमी, रामसू नरोटे, प्रवीण लेकामी, रमेश हेडो, सचिन लेकामी, लालू पदा, झुरु तेलामी, मंगेश वड्डे, पेका लेकामी, अनिल काकडी, मंगू गोटा, लालू तेलामी, सत्तू झोरे, सत्तू तुमरेट्टी, सवजी झोरे, रावजी कोवसे, जीवन केरकेडा, वासूदेव हिचामी, भीमा पदा, मनोज गोटा, तोंदे तिम्मा आणि दिलीप लेकामी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

