LatestNewsगोंदिया

रात्रीच्या अंधारात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची अचानक भेट ! मोरगाव अर्जुनीतील नागरी आरोग्य मंदिराची ऑन-द-स्पॉट तपासणी

स्वतःचा रक्तदाब मोजून उपकरणांची घेतली थेट परीक्षा!

अर्जुनी मोरगाव (विशेष प्रतिनिधी): ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आणण्यासाठी आणि शेवटच्या घटकाला दर्जेदार सेवा मिळते की नाही हे तपासण्यासाठी गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी थेट रात्रीच्या वेळी धडक कारवाईचा बडगा उगारला. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील ताडगाव रोडवरील ‘नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर’ येथे ५ ऑक्टोबरच्या रात्री ७ वाजता अचानक छापा टाकत त्यांनी आरोग्य केंद्राची कसून झाडाझडती घेतली. केवळ कागदी अहवालांवर विसंबून न राहता अधिकाऱ्याने स्वतः फिल्डवर उतरून केलेल्या या थेट कारवाईमुळे दुर्गम भागातील झोपेचे सोंग घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.रात्रीच्या वेळी डॉक्टर आणि कर्मचारी गायब राहण्याच्या अनेक तक्रारी ग्रामीण भागात सातत्याने समोर येत असताना, या केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. बंसोड यांच्यासह आरोग्य सेवक, स्टाफ नर्स आणि परिचर कर्तव्यावर हजर असल्याचे आढळले. केवळ उपस्थिती तपासून डॉ. गोल्हार थांबले नाहीत, तर केंद्रातील तपासणी उपकरणांचा दर्जा तपासण्यासाठी त्यांनी चक्क स्वतःचा रक्तदाब (बीपी) मोजून यंत्रणेची कार्यक्षमता थेट ऑन-द-स्पॉट तपासली. या अचानक केलेल्या तपासणीदरम्यान आवश्यक औषधांचा साठा, प्रयोगशाळेतील तपासणी साहित्य आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांची बारकाईने पाहणी करण्यात आली.या पाहणी दौऱ्यात त्यांनी कर्मचाऱ्यांना कोणतीही हयगय न करता कामाला लागण्याचे कडक आदेश दिले. गरोदर महिलांची वेळेत नोंदणी, अतिजोखमीच्या मातांचे तातडीचे व्यवस्थापन आणि बालकांच्या नियमित लसीकरणात कसलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला. याशिवाय मधुमेह व उच्च रक्तदाबासारख्या असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान, तसेच शासनाच्या “सेवा संकल्प अभियान” आणि “तिशीचा पल्ला – तपासणी अन सल्ला” या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे स्पष्ट निर्देश दिले.या अचानक धाडीदरम्यान मोरगाव अर्जुनीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, तालुका आरोग्य सहाय्यक सुरेश धुर्वे आणि तालुका लेखापाल शैलेश तिवारी उपस्थित होते. ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कामचुकार यंत्रणेला थेट इशारा देत, प्रत्येक आरोग्य केंद्राने वेळेचे काटेकोर पालन करून तत्पर सेवा दिलीच पाहिजे; अन्यथा कारवाई अटळ आहे, असा कडक इशारा डॉ. गोल्हार यांनी दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *