LatestNewsगुन्हेवार्तागोंदियाविदर्भ

घराच्या वाडीत गांजाची शेती करणारा आरोपी गजाआड; चिचगड पोलिसांची धडक कारवाई

१७ हिरवीगार झाडे उपटून काढली; १.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

देवरी/चिचगड : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात अंमली पदार्थांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असतानाच, चक्क राहत्या घराच्या परसबागेत गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवरी तालुक्यातील धमदीटोला येथे घरामागील वाडीत गांजाची झाडे लावून त्याची मशागत करणाऱ्या एका ५४ वर्षीय व्यक्तीवर चिचगड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६२ हजार ७५० रुपये किमतीची एकूण १७ लहान-मोठी गांजाची झाडे जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आत्माराम मधो मडावी (वय ५४ वर्षे, रा. धमदीटोला, ता. देवरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सविस्तर वृत्त असे की, देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व सीमावर्ती भागात अंमली पदार्थांची छुपी तस्करी आणि साठा रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार विशेष शोधमोहीम राबविली जात आहे. त्यादरम्यान, धमदीटोला येथील आत्माराम मडावी याने आपल्या राहत्या घराच्या मागील परसात (वाडीत) बेकायदेशीररीत्या गांजाच्या रोपांची लागवड केल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती चिचगड पोलिसांना मिळाली.परसबागेत छापा; १७ झाडांची लागवड उघडकीसमाहिती मिळताच चिचगड पोलीस ठाण्याच्या पथकाने धमदीटोला येथे जाऊन संशयिताच्या घरामागील वाडीत पंचांसमक्ष अचानक धाड टाकली. पाहणी केली असता तेथे पालेभाज्यांच्या आडोशाला गांजाची लहान-मोठी १७ हिरवीगार झाडे पद्धतशीरपणे वाढविल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ सर्व झाडे उपटून ताब्यात घेतली. जप्त केलेल्या या ओल्या गांजाच्या झाडांचे एकूण वजन ३ किलो २५५ ग्रॅम भरले असून, त्याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत १ लाख ६२ हजार ७५० रुपये इतकी आहे.चिचगड पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी आत्माराम मडावी याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. हा गांजा स्वतःच्या वापरासाठी होता की परिसरातील अवैध विक्रेत्यांना पुरविण्यासाठी याची लागवड केली जात होती, याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत. ही धडक कारवाई चिचगडचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे, पोलीस उपनिरीक्षक वासुदेव, सहायक फौजदार ग्याणिराम राऊत, सहायक फौजदार कानपूरिया, पोलीस हवालदार शहारे, राऊत, गाते, पोलीस नाईक ताराम, पोलीस शिपाई देशमुख, महिला पोलीस शिपाई मरस्कोल्हे आणि करीना शेंडे यांच्या पथकाने केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *