LatestNewsगुन्हेवार्तामहाराष्ट्र

लग्नाचं आमिष, ४८ लाखांचा चुना आणि थेट रशियाला पोबारा;

सावधान! ‘वर’ शोधताना तुमचीही फसगत होतेय?

दिल्ली विमानतळावर मुंबई पोलिसांनी असं कसं पकडलं?

ठाणे: लग्न जुळवण्यासाठी असलेल्या साईट्सवर स्वतःचे खोटे प्रोफाईल बनवून, महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्याशी मंदिरात बनावट लग्न करायचे आणि नंतर परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटणाऱ्या एका आंतरराज्यीय महाठगाला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. सुरेश रविंद्र असे या ३७ वर्षीय अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा तेलंगणाचा रहिवासी आहे. या सराईत गुन्हेगाराने आतापर्यंत विविध महिलांना लग्नाचे आमिष दाखवून आणि परदेशात नोकरी लावण्याचे आमिष देऊन तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलांना लुटलेला हा पैसा आरोपी सुरेश स्वतःवर खर्च करायचा आणि या पैशातून तो देश-विदेशात महागड्या सहली करायचा, तसेच बड्या शहरांमधील पब आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये पाण्यासारखा पैसा उडवून ऐषोआराम करायचा.गेल्या महिन्यात ठाण्यातील एका पीडित महिलेने या ठगाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती, ज्यामध्ये तिची ४८ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध ‘लुक आऊट सर्कुलर’ जारी केले होते. आरोपी सुरेश रविंद्र हा रशियाला पळून गेला होता, मात्र तो रशियाहून दिल्ली विमानतळावर उतरताच लुक आऊट नोटीसच्या आधारे विमानतळ प्राधिकरणाने त्याला ताब्यात घेतले आणि २ जून रोजी कासारवडवली पोलिसांच्या पथकाने दिल्लीत जाऊन त्याला अधिकृतपणे अटक केली.पोलिसांनी या ठगाचा अधिक तपास केला असता त्याचे अनेक काळे कारनामे समोर आले आहेत. त्याने तेलंगणातील अल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेशी लग्न करून १५ लाख रुपये उकळले होते, तर तिच्या मित्रांना युरोपमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १८ लाख रुपयांना वेगळे ठगले होते. याशिवाय विशाखापट्टणम येथील एका महिलेला जाळ्यात ओढून ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे. हा ठग इतका सराईत आहे की, जेव्हा पोलिसांनी त्याला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले, तेव्हाही तो एका नव्या महिलेला आपल्या जाळ्यात ओढण्याच्या आणि तिची फसवणूक करण्याच्या तयारीत होता. आरोपी सुरेश रविंद्रने अशाच प्रकारे आणखी काही महिलांची फसवणूक केली असण्याची दाट शक्यता असून, जर मुंबई, ठाणे किंवा इतर भागातील कोणत्याही महिलेसोबत असा प्रकार घडला असेल, तर त्यांनी भीती न बाळगता तात्काळ कासारवडवली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांनी केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *