Navegaon bandh : विकासासाठी आराखडा तयार करून शासनाकडे पाठवावा : आमदार राजकुमार बडोले
पर्यटन विकासासाठी आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
अर्जुनी-मोर : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर. तालुक्यातील नवेगाव बांध (navegaon bandh) पर्यटन संकुल परिसराचा सविस्तर विकास आराखडा तयार करून तो राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. नवेगाव बांध येथील लाँगहट शासकीय निवासस्थानावर त्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक 22 सप्टेंबर ला पार पडली. या बैठकीस वन विभाग, पाटबंधारे विभाग, व्याघ्र प्रकल्प अधिकारी तसेच स्थानिक निसर्गप्रेमी व पर्यटनप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवेगाव बांध (navegaon bandh) जलाशयात त्वरित बोटिंग सुरू करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. इरिगेशन विभागाने आवश्यक परवाने घेऊन बोटिंग सेवा सुरू करावी, तर वन विभागाने पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करून शासनाकडे पाठवावा, ज्यायोगे निधी मंजूर होऊन तातडीने कामांना गती देता येईल, असे आमदार बडोले यांनी (ता.22) स्पष्ट केले.

पर्यटन संकुल परिसरात घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकबंदी काटेकोरपणे राबविणे, सर्व व्यावसायिकांची नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देणे, पर्यटकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी कार्यपद्धती सुरू करणे, परिसरातील विद्युतीकरण सौर ऊर्जेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय तसेच एमटीडीसीकडील १६ एकर जागा विकसित करून रिसॉर्ट व सोयीसुविधा वाढविण्याचे निर्णय बैठकीत घेण्यात आले. यावेळी आमदार बडोले यांनी वन्यजीव विभागाच्या मालकीतील लोखंडी पिंजरे, साहसी खेळासाठीचे साहित्य, कापडी तंबू आदी प्रकल्प धूळ खात पडले असून त्यातून शासनाला महसूल मिळत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “शासकीय पैसा खर्च करून रोजगार निर्मिती व महसूल मिळत नसेल तर असे प्रकल्प उभारू नका,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला.
(navegaon bandh) नवेगाव बांधासोबतच प्रतापगड तीर्थक्षेत्र, कालीमाती तीर्थक्षेत्र, तिबेट तीर्थक्षेत्र या स्थळांना जोडून प्रादेशिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता देखील बैठकीत अधोरेखित झाली. नवेगाव बांध येथे येणारा पर्यटक मोठ्या अपेक्षेने येतो. त्याला सर्व सुविधा मिळून तो समाधानी होऊन परतावा, ही प्रत्येक विभागाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार बडोले यांनी केले.
या बैठकीस पियुष जगताप क्षेत्र संचालक तथा उपवन संरक्षक एन एन टी आर गोंदिया, प्रीतमसिंग कोडापे उपवन संरक्षक तथा उपसंचालक एन एन टी आर साकोली, अविनाश मेश्राम प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी प्रादेशिक वनविभाग नवेगाव बांध, राजीव कुरेकार कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग गोंदिया, संकल्प मेश्राम पाटबंधारे विभाग नवेगाव बांध (navegaon bandh) शाखा क्र.१, प्रतिभा रामटेके वनपरिक्षेत्र अधिकारी राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध, प्रमोद पजारे वनपरिक्षेत्र अधिकारी राष्ट्रीय उद्यान स्वागत नवेगाव बांध, इंजि. सुनील तरोणे गोंदिया, इंजी. रहांगडाले एन एन टी आर गोंदिया, यशवंत गणवीर माजी उपाध्यक्ष गोंदिया, किशोर तरोणे माजी जि.प सदस्य, लोकपाल गहाणे, नवेगाव बांध (navegaon bandh) फाउंडेशनचे सचिव रामदास बोरकर, चेतन नाकाडे, राहुल ठवरे, संजय खरवडे, मत्स्य सहकारी संस्था नवेगाव बांधचे अध्यक्ष संजय भुमके व सचिव तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

