कलपाथरी परिसरात वाघाची दहशत; शेतकर्यांचे शेतात जाणे बंद !
१० दिवसांपूर्वी वाघाने घेतला होता तरुणाचा बळी;
अनेक गावांमध्ये भीतीचे सावट, शेतीची कामे ठप्प
गोरेगाव : तालुक्यातील कलपाथरी जंगल परिसरात वाघाच्या सततच्या वावरामुळे स्थानिक नागरिक आणि विशेषतः शेतकर्यांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. दहा दिवसांपूर्वी वाघाने एका तरुणावर हल्ला करून त्याला आपले भक्ष्य बनवले होते. या भीषण घटनेनंतरही परिसरात त्याच वाघाची उपस्थिती कायम असल्याने शेतकर्यांनी धास्तीपोटी आपल्या शेतात जाणेच सोडून दिले आहे. अत्यंत गरजेच्या कामासाठी जर कोणाला शेतात जावेच लागले, तर एकटे न जाता जीवाच्या भीतीने समूहाने (गटाने) जावे लागत आहे. या वाघाच्या दहशतीमुळे सध्या शेतीची कामे पूर्णपणे रखडली आहेत.
गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी, पालेवाडा, घुमर्रा, तेलनखेडी आदी गावे घनदाट जंगलाला लागून आहेत. येथील शेतकर्यांची शेतीही अगदी जंगलाच्या सीमेला लागूनच आहे. हा परिसर नवेगाव-नागझिरा अभयारण्याचा ‘बफर झोन’ क्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागात वाघ, बिबट्या यांसारख्या हिंस्त्र श्वापदांचा वावर नेहमीच पाहायला मिळतो. मात्र, आता थेट शेतांच्या परिसरात वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकर्यांचे धाबे दणाणले आहेत.
दहा दिवसांपूर्वी कलपाथरी येथील रहिवासी ३१ वर्षीय तरुण दुलेश्वर संतोष खरकाटे हा गत ५ जून रोजी जंगलात शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. दरम्यान, जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक प्राणघातक हल्ला करून ठार केले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेला १० दिवस उलटून गेले तरी वाघाची दहशत कमी झालेली नाही. गेल्या ४-५ दिवसांपासून हाच वाघ पुन्हा याच परिसरात फिरत असल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
सध्या खरीप हंगामाची कामे सुरू असून शेतकर्यांची कामे आटोपण्याला घेवून लगबग सुरू आहे. मात्र, वाघाच्या भीतीमुळे शेतकर्यांनी शेताकडे पाठ फिरवली आहे. यामुळे चालू हंगामातील शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहेत. वनविभागाने या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.


