पत्नीच्या डोळ्यांदेखत जंगलात ओढून नेले; वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू!
तुमसर तालुक्यातील दावेझरी-चुलरडोह-आगरी वन क्षेत्रातील घटना
वन विभागाचा सतर्कतेचा इशारा
सिहोरा () : तुमसर तालुक्यातील आगरी गावाजवळ असलेल्या दावेझरी-चुलरडोह-आगरी वन क्षेत्रात गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. बंसीलाल मेश्राम (५५, रा. दावेझरी) असे मृत गुराख्याचे नाव आहे. या घटनेमुळे जंगलालगतच्या चार-पाच गावांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंसीलाल मेश्राम हे आपल्या पत्नीसोबत गुरे चरण्यासाठी चुलरडोह-आगरीच्या जंगलात गेले होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. वाघाने बंसीलाल यांना जबड्यात घट्ट पकडून पत्नीच्या डोळ्यांदेखतच जंगलातील टेकडीच्या दिशेने ओढून नेले. पत्नीने आरडाओरड केल्यानंतर लगतचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले, मात्र तोपर्यंत वाघ त्यांना दाट जंगलात घेऊन गेला होता.
शोधमोहिमेत सापडला छिन्नविछिन्न मृतदेह
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्या व कुऱ्हाडी घेऊन वाघाच्या दिशेने जंगलात शोधमोहीम सुरू केली. आगरी-नागझिरा या खोल वन क्षेत्रात शोध घेतला असता बंसीलाल मेश्राम यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दावेझरी गावात शोकाकूल वातावरण पसरले आहे.
वन विभागाचे सतर्कतेचे आवाहन
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने जंगलालगतच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी विनाकारण जंगलात जाऊ नये, एकट्याने गुरे चरायला नेणे टाळावे तसेच सकाळ व सायंकाळच्या वेळी जंगलाच्या परिसरात ये-जा करू नये, असा सल्ला वन विभागाने दिला आहे.

