अर्जुनी मोरगावजवळ काळाचा घाला: चारचाकीच्या धडकेत मोपेडस्वार आजोबा ठार, नात गंभीर जखमी!
कोहमारा-वडसा मार्गावर भीषण अपघात
अर्जुनी मोरगाव : भरधाव चारचाकी वाहनाने मोपेड दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत मोपेडस्वार आजोबांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची १९ वर्षीय नात गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (५ ऑक्टोबर) दुपारी कोहमारा-वडसा मार्गावरील कोरंबी गावाजवळ घडली. साधू ऋषी नाकाडे (वय ७२, रा. कोरंबीटोला) असे अपघातात ठार झालेल्या आजोबांचे नाव असून, प्रियंका भास्कर नाकाडे (वय १९) असे गंभीर जखमी झालेल्या नातीचे नाव आहे.
कोरंबीटोला येथील रहिवासी साधू नाकाडे हे सोमवारी दुपारी आपल्या ज्युपिटर दुचाकीने (क्र. MH 35 AV 3644) नात प्रियंका हिच्या महाविद्यालयीन कामासाठी अर्जुनी मोरगाव येथे आले होते. कामावरून परतताना वडसा ते कोहमारा या राज्य मार्गावरून कोरंबीटोलाकडे जात असताना कोरंबी येथील स्मशानभूमीजवळ वडसाकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या (क्र. MH 04 JB 8807) चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे तुकडे-तुकडे होऊन साधू नाकाडे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर मागे बसलेली प्रियंका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ब्रह्मपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृतकाचा भाऊ प्रकाश विनायक नाकाडे यांच्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी चारचाकी चालक सचिन नारायण बोरकर (वय ३१, रा. कनेरी केशोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

