सीएमआर तांदूळ घोटाळ्याची चौकशी तापणार: विभागीय आयुक्तांकडून चार सदस्यीय समिती गठीत
गोंदियातील निकृष्ट तांदूळ पुरवठा प्रकरण: आठवड्याभरात अहवाल देण्याचे आदेश!
राईस मिलर्स अन् पुरवठा विभागात खळबळ; गोदामांची होणार थेट तपासणी!
गोंदिया : जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२५-२६ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या धानाच्या भरडाईनंतर जमा होणारा अतिरिक्त ‘सीएमआर तांदूळ’ (Custom Milled Rice) निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी मंत्रालयासह विभागीय आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर तक्रारींची दखल घेत विभागीय आयुक्तांनी चौकशीसाठी चार सदस्यीय विशेष समिती गठीत केली आहे. या समितीला येत्या आठवड्याभरात चौकशी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याने राईस मिलर्स आणि पुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत हमीभावाने धानाची खरेदी करून ते राईस मिलर्सकडे भरडाईसाठी दिले जाते. त्यानंतर तयार झालेला तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत अमरावती, बुलढाणा, जालना, वाशीम आणि मुंबई यांसारख्या विविध जिल्ह्यांमधील स्वस्त धान्य दुकानांत वितरीत केला जातो. मात्र, गोंदियातून पुरवठा करण्यात आलेल्या तांदळाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि मंत्रालयाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी चार सदस्यीय समिती स्थापन केली. या चौकशी पथकात विभागीय तांत्रिक अधिकारी संतोष सरडे, विभागीय पुरवठा अधिकारी पंकज जळेकर, सहाय्यक अव्वल कारकून विकास बिपटे आणि सहाय्यक स्वप्निल इंभारे यांचा समावेश आहे. हे पथक मंगळवारपासून प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात करणार आहे.
समिती ‘या’ बाबींची करणार सखोल चौकशी:
गुणवत्ता व साठा: गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदळाची प्रत्यक्ष गुणवत्ता आणि गोदामनिहाय उपलब्ध साठ्याची तपासणी केली जाईल. वजन काट्यांची अचूकता: गोदाम व भरडाई केंद्रावरील वजन काटा अचूक आहे की नाही, याची पडताळणी होणार.
पावती व वजनातील तफावत: पावतीवर नमूद केलेले वजन आणि प्रत्यक्षात उचल करण्यात येणाऱ्या धानाच्या वजनात आढळणाऱ्या तफावतीची सखोल चौकशी केली जाईल.

