वर्चस्वाच्या लढाईतून दोन वाघांमध्ये तुंबळ ‘झुंज’; एकाचा जागीच मृत्यू, ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील थरार
बलाढ्य वाघाने जंगलातून पाठलाग करून शेतात केले ठार
मृतदेहाचा काही भाग खाल्ल्याचे उघड, परिसरात भीतीचे सावट
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : वाघांची वाढती संख्या आणि अधिवासाच्या (टेरिटरी) वर्चस्वाच्या वादातून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रात दोन वाघांमध्ये भीषण रक्तरंजित झुंज झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हिंसक संघर्षात दीड ते दोन वर्षे वयाच्या एका तरुण वाघाचा मृत्यू झाला. एका बलाढ्य वाघाने या तरुण वाघाचा जंगलातून थेट शेतापर्यंत पाठलाग करून त्याला जागीच ठार केले आणि त्यानंतर त्याच्या शरीराचा काही भाग अर्धवट खाल्ल्याचे वनविभागाच्या पाहणीत निष्पन्न झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बरडकिन्ही येथील शेतकरी पटवारी गेडाम हे आपल्या शेतात गेले असता त्यांना एका वाघाचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पाठलाग करून शेतात गाठले; फरफटत नेल्याच्या खुणा
घटनास्थळावर रक्ताचे थारोळे आणि जमिनीवर फरफटत नेल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. यावरून एका मोठ्या व बलाढ्य वाघाने स्वतःचे प्रादेशिक वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या तरुण वाघाचा जंगलातून शेतापर्यंत पाठलाग केला आणि शेतात गाठून त्याला ठार केल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. मृत वाघाचे ब्रह्मपुरी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नियमावलीनुसार शवविच्छेदन करण्यात आले. तसेच पुढील न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणीसाठी त्याचा ‘व्हिसेरा’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
हल्लेघोर वाघाच्या शोधासाठी ‘कॅमेरा ट्रॅप’
दरम्यान, तरुण वाघावर हल्ला करून त्याला ठार करणाऱ्या दुसऱ्या बलाढ्य वाघाची ओळख पटविण्यासाठी वनविभागाने या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. ब्रह्मपुरी परिसरात वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्यामुळे स्वतःचे स्वतंत्र क्षेत्र (टेरिटरी) निर्माण करण्यासाठी तरुण वाघांना जुन्या व बलाढ्य वाघांशी संघर्ष करावा लागत असल्याचे मत वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या रक्तरंजित संघर्षामुळे बरडकिन्ही व लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना शेतात जाताना विशेष काळजी घेण्याचे आणि समूहाने जाण्याचे आवाहन केले आहे.

