शिकारीच्या नादात विहिरीत पडला बिबट्या आणि ४ रानडुकरे
तासनतास चाललेल्या थरारक मोहिमेनंतर बिबट्याला जीवदान
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तिडी (बु.) गावात शुक्रवारी सकाळी एक अत्यंत थरारक आणि सनसनाटी घटना समोर आली. शेतातील एका उघड्या विहिरीत शिकारीचा पाठलाग करताना एक बिबट्या आणि चार रानडुकरे आत पडले.
पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे पाचही वन्यजीव धडपड करत होते. या धडपडीत तीन रानडुकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर बिबट्याचा एक पाय मोडला. ही घटना तिडी येथील मोहतकर नामक शेतकऱ्याच्या शेतात सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याने रानडुकरांच्या कळपावर हल्ला केला असावा असा अंदाज आहे. जीव वाचवण्यासाठी पळणारी डुकरे आणि त्यांच्या मागे वेगाने धावणारा बिबट्या थेट विहिरीत जाऊन कोसळले. विहिरीतून येणारा डुकरांचा ओरडण्याचा आणि बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. तेथील दृश्य पाहून त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली.
तासनतास चालले थरारक ‘रेस्क्यू ऑपरेशन’
घटनेची माहिती मिळताच कळमेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी पी. एल. साठवणे आणि नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) चे विशेष बचाव पथक दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. टीटीसी समन्वयक कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. प्रियंवल चौरागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कठीण परिस्थितीत बचाव कार्य सुरू केले.
जखमी बिबट्याला उपचारासाठी नागपूरला हलवले
अथक प्रयत्नांनंतर जखमी बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघातात बिबट्याचा एक पाय मोडल्याने त्याला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी नागपूर येथील ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) मध्ये पाठवण्यात आले. विहिरीत अडकलेल्या चौथ्या रानडुकराला सुरक्षित बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले, तर मृत पावलेल्या तीन रानडुकरांना नियमानुसार खड्डा खोडून पुरण्यात आले. या मोहिमेत वन परिक्षेत्र अधिकारी पी. एल. साठवणे, क्षेत्र सहाय्यक के. एस. वाटकर, पी. व्ही. घुगल, ए. एस. कातकडे, डी. के. पदवाल, एम. सी. बोपटे, मंगेश पांडे, चेतन बारस्कर, राजू खांडेकर, विलास मंगर, महेश मोरे आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

