भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत ८ मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू
लाखनी-साकोली महामार्गावरील पिंपळगावजवळ दुर्दैवी घटना सर्व मृतक छत्तीसगडचे मजूर : नियंत्रण सुटून ट्रॅक्स भरधाव ट्रकला धडकली
भंडारा (नवचैतन्य) : भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी व हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील लाखनी-साकोली तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि ट्रॅक्स गाडीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात ८ मजुरांचा घटनास्थळीच करुण अंत झाला. अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे छत्तीसगड राज्यातील मजूर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील मजूर ट्रॅक्स गाडीने नागपूरच्या दिशेने प्रवासाला निघाले होते. पिंपळगाव येथील एका पेट्रोल पंपावरून एक आयशर ट्रक महामार्गावर निघत असताना, पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील ट्रॅक्स थेट आयशर ट्रकवर जाऊन जोरात आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रॅक्स गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.या अपघातात ट्रॅक्समधील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नॅशनल हायवे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातातील गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.महामार्गावरील वाहतूक सुरळीतअपघाताची बातमी समजताच स्थानिक नागरिकांनी व हायवे पोलिसांनी बचावकार्य राबवले. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.मात्र, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील सखोल तपास सुरू आहे.

