ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची भेट
रुग्णसेवा, स्वच्छता आणि औषधसाठ्याची सखोल पाहणी
अर्जुनी मोरगाव (दि.३० जुलै) –ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी मंगळवारी अचानक अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील विविध सेवा-सुविधांचा सखोल आढावा घेतला आणि रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या उपचारासंदर्भातील अनुभव जाणून घेतले.

अध्यक्ष भेंडारकर यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. वैद्यकीय सेवा वेळेवर व योग्य प्रकारे मिळत आहेत का, रुग्णालयातील स्वच्छता राखली जाते का, औषधांचा साठा उपलब्ध आहे का, डॉक्टर व नर्सिंग कर्मचारी वेळेवर उपस्थित असतात का, या सर्व बाबींची त्यांनी बारकाईने पाहणी केली.
भेटी दरम्यात ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेले मोरगाव येथील शेतकरी मार्कंड सिताराम वलके यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याने गंभीर दुखापत झाली. तसेच गिरीधारी मंगलमूर्ती शिवणकर या विद्यार्थ्यांला अपघातात गंभीर दुखापत झाली. यावेळी या दोघांच्याही तब्येतीची विचारपूस केली तसेच अस्वलाच्या हल्यात जखमी झालेल्या मार्कंड वलके यांना त्वरीत वनविभागाकडून मदत करण्यात यावी याकरिता वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून सूचना दिल्या.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना भेंडारकर म्हणाले, “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे काम जिल्हा परिषद करत आहे. रुग्णालयातील कमतरता लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात येतील.”
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा गेडाम, डॉ. पवार, डॉ. कापगते, डॉ. गाईन, डॉ. पाल, डॉ. सीरसाम तसेच इतर वैद्यकीय व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
भेटी दरम्यान ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेबाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच रुग्णालय प्रशासनाला कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याचे आणि रुग्णांचे समाधान सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. या भेटीद्वारे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील कामगिरीची थेट पाहणी करत, प्रशासनाने लोकाभिमुख धोरण राबवण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ केला आहे.