LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात जखमी अस्वलाचे यशस्वी रेस्क्यू

वनविभागाच्या तत्परतेमुळे संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टळला; उपचारासाठी गोरेवाडा येथे रवाना
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत नागझिरा खंडातील कोका वन्यजीव अभयारण्य परिसरात द्विवरवाडा गावालगतच्या स्मशानभूमी परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या अस्वलाचे वनविभागाने यशस्वी रेस्क्यू केले. दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8.17 वाजता सहवनक्षेत्र कोका, नियतक्षेत्र डोंगरदेव, कक्ष क्रमांक 162 येथे ही कार्यवाही करण्यात आली. अस्वलाच्या मागील उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले असून, पुढील उपचारांसाठी त्याला गोरेवाडा येथील वन्यजीव उपचार केंद्रात पाठविण्यात आले आहे.
ढिवरवाडा गावालगतच्या स्मशानभूमी परिसरात अस्वल भ्रमण करत असताना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. अस्वल जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात येताच संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने वनरक्षक आकाश जाधव यांच्याशी संपर्क साधून वन्यजीव विभागाला घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आणि निर्धारित प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन करत वनविभागाने जखमी अस्वलाला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली. क्षेत्र संचालक पियुषा जगताप आणि उपसंचालक तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सहायक वनसंरक्षक सुहास कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरजकुमार गोखले, मानद वन्यजीव रक्षक भंडारा शाहीद खान, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी मेघराज तुलावी, क्षेत्र सहाय्यक मेश्राम, बिट रक्षक जाधव, जलद प्रतिसाद पथकातील (RRT) शूटर व कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व संबंधित यंत्रणांमधील समन्वय आणि अथक प्रयत्नांमुळे अस्वलाला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात यश आले.
जेरबंद केल्यानंतर अस्वलाची प्राथमिक पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्या मागील उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले. त्यानंतर अस्वलाला प्राथमिक उपचार देऊन पुढील आवश्यक औषधोपचारासाठी गोरेवाडा येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविण्यात आले.
वनविभागाने वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत झाली. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी तसेच नागरिक आणि वन्यप्राण्यांमधील संघर्षाच्या घटना रोखण्यासाठी वनविभाग, वन्यजीव बचाव पथक आणि स्थानिक नागरिक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे या मोहिमेतून अधोरेखित झाले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *