खर्रातील चघळलेल्या सुपारीच्या DNA वरून वृद्धेच्या खुनाचा उलगडा; शेजारीच निघाला मारेकरी!
सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव येथील थरार : एलसीबी व डुग्गीपार पोलिसांची संयुक्त कारवाई
सडक अर्जुनी/गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव (राका) येथे घरात एकट्या राहणाऱ्या ८१ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून करत अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या निर्घृण प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व डुग्गीपार पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. मृतदेहावर सापडलेल्या खर्रातील चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यांच्या डीएनए (DNA) विश्लेषणावरून आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, वृद्धेचा शेजारीच तिचा मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी विलास किशन मेश्राम (वय ४२, रा. पळसगाव) या संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे की, १ ते २ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्री पळसगाव येथील रहिवासी कुसुमबाई चेतराम कापगते (वय ८१) या घरी एकट्या असताना अज्ञात आरोपीने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला होता. आरोपीने आजींचा निर्घृण खून करून त्यांच्या अंगावरील २ सोन्याच्या बांगड्या, १ सोन्याची अंगठी आणि काळी पोत (सोन्याचे मणी असलेली) असा सुमारे १ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी नातू पराग परमानंद कापगते यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१), ३०९(६), ३३१(७) व ३३२(ब) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फॉरेन्सिक तपास अन् खर्रा ठरला ‘गेमचेंजर’
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळावर सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अथवा तांत्रिक डाटातून कोणताही ठोस धागादोरा मिळत नव्हता. मात्र, घटनास्थळाची बारकाईने पाहणी करताना मृत कुसुमबाई यांच्या अंगावर आरोपीने थुंकलेल्या खर्रातील चघळलेल्या सुपारीचे तुकडे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी ते तुकडे जप्त करून तात्काळ नागपूर येथील न्यायवैज्ञान प्रयोगशाळेत (FSL) डीएनए प्रोफाइलिंगसाठी पाठवले.
कर्जबाजारी शेजाऱ्यावर संशय अन् डीएनए जुळला
एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात गावात गुप्त पाळत ठेवण्यात आली. वृद्धेच्या हालचालींची खडान् खडा माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच हे कृत्य केल्याचा संशय बळावल्याने संशयितांची यादी तयार करण्यात आली. यात मृत आजींच्या घराशेजारी राहणारा विलास मेश्राम हा प्रचंड कर्जबाजारी असून त्याला पैशांची तातडीची गरज असल्याचे समोर आले. संशयावरून गावातील चार जणांचे रक्ताचे नमुने घेऊन नागपूर लॅबमध्ये पाठविण्यात आले होते.
तपासादरम्यान, आरोपी विलास याने सडक अर्जुनी, सौंदड आणि भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील सराफा व्यापाऱ्यांशी दागिने विकण्यासाठी संपर्क साधल्याचे तांत्रिक पुराव्यांवरून स्पष्ट झाले. याच दरम्यान नागपूर न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात, मृतदेहावर मिळालेल्या सुपारीचा डीएनए आणि आरोपी विलास मेश्राम याचा डीएनए तंतोतंत जुळल्याचे निष्पन्न झाले.
गुन्ह्याची दिली कबुली
डीएनए अहवालाचा ठोस पुरावा हाती येताच पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विलास मेश्राम याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला असता, त्याने सोन्याच्या दागिन्यांसाठीच आजींचा खून करून ऐवज लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, सपोनि अमरदीप खाडे, सपोनि अभिषेक जंगमवार, डुग्गीपारचे ठाणेदार कमलेश सोनटक्के, सपोनि नावेद शेख, सपोनि रूपाली पवार, पो.हवा. तुळशीदास लुटे, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, दीक्षितकुमार दमाहे, पोलीस अंमलदार राकेश इंदूरकर, सुनील उहाके, निखिल मेश्राम, विलेश ठाकरे, राम खंडारे, मुरली पांडे, इम्रान समद तसेच डुग्गीपारचे जागेश्वर उईके, दीपक खोटेले, गुणवंत कठाणे, दिलीप हातझाडे, उदयभान रुखमोडे, गिरीश लांजेवार आणि सायबर सेलचे सपोनि देवीदास ठमके, योगेश रहीले यांनी केली.

