LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा द्या; गोंदियातून राष्ट्रपतींना पाठविले ६९ हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र!

स्वतंत्र गोमंत्रालय स्थापन करण्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा
गोंदिया :
गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करावे, गोवंश संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय गोमंत्रालय स्थापन करावे आणि गोसंवर्धनाला राष्ट्रीय स्तरावर विशेष संरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी गोंदिया जिल्ह्यातील विविध सामाजिक, धार्मिक आणि गोसेवा संस्थांनी मोठी जनचळवळ उभारली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ६९ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन थेट राष्ट्रपतींच्या नावे पाठवण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले असून, या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. या निमित्ताने सोमवारी (दि. २७) गोंदियात जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढण्यात आला.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या हजारो नागरिकांनी या मोर्च्यात अत्यंत हिरिरीने सहभाग नोंदवला. हातात भगवे झेंडे, गोमातेची छायाचित्रे आणि मागण्यांचे फलक घेऊन सहभागी नागरिकांनी शहरातून जोरदार घोषणाबाजी केली. ‘गोमाता राष्ट्रमाता हो’, ‘गोवंश वाचवा, संस्कृती जपा’ अशा खणखणीत घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. आंदोलनकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी परंपरेत गायीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. शेती, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती आणि पर्यावरण संवर्धनात गायीचे अफाट योगदान लक्षात घेता तिला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा देणे ही काळाची गरज आहे. तसेच देशभरातील गोवंश संरक्षणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र गोमंत्रालय स्थापन करण्यात यावे, अशीही आग्रही मागणी करण्यात आली. या मोर्चात गोविंद येडे, हंसराम रोकडे, रामकृष्ण बावनकर, कुवरलाल भगत, स्वदेश ठाकूर, गौरव वानखेडे, डॉ. प्रशांत कटरे, शंकरलाल अग्रवाल, महेश पांडे, जय चौरसिया, सुनील गजभिये, गजानन राय, अंकित कुलकर्णी, पंकज चौधरी, राजीव ठाकरेले, दीप्ती मिश्रा, सुनील तिवारी, अजित सिंग, रमेश अग्रवाल यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक आणि गोसेवा संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
…………………………..
प्रमुख मागण्या एका नजरेत:
गोमातेला ‘राष्ट्रमाता’ चा अधिकृत दर्जा देण्यात यावा.
गोवंश संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय गोमंत्रालय स्थापन करावे.
गोहत्याबंदी कायद्याची अत्यंत कठोर अंमलबजावणी करण्यात यावी.
गोशाळांना नियमित आर्थिक अनुदान द्यावे आणि गोपालकांसाठी विशेष सहाय्य योजना राबवाव्यात.
गोसंवर्धनासाठी राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात यावे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *