LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

वाघाच्या हल्ल्यात आगरझरीत महिला ठार; गोंडपिंपरीत दुसरी महिला गंभीर जखमी!

 ताडोबा-अंधारी प्रकल्पातील थरार; शेतातून घरी परतताना वाघाची झडप; ५० हजारांची तात्काळ मदत जाहीर
 चंद्रपूर/गोंडपिंपरी:
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी तलाव परिसरात सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३५ वाजताच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात ६० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत गोंडपिंपरी तालुक्यातील चेक सोमनपल्ली येथे शेतातून घरी परतणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
तलावाकाठी खताची पिशवी धुताना वाघाची झडप:
आगरझरी येथील रहिवासी मंदा सूर्यभान मंगाम (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या तलावाकाठच्या शेतात खताची पिशवी धुण्यासाठी गेल्या असता जंगलाच्या दिशेने आलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला व काही अंतर ओढत नेले. आगरझरी परिसरात वाघाच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. मृत महिलेच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी आहे. घटना सर्वे क्रमांक १०/४, कंपार्टमेंट क्रमांक १८७ परिसरात घडली.
नागरिकांची धावपळ व वनविभागाची तात्काळ मदत:
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. यावेळी परिसरात वाघाची हालचाल दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. बचावासाठी धावताना काही ग्रामस्थ खाली पडले, तर एक जण झाडावर चढला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना सुरक्षित अंतरावर हलवले. वनविभागाकडून मृत महिलेच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आला आहे.
दुसरी घटना: गोंडपिंपरीत शेतातून परतताना वाघाचा हल्ला:
गोंडपिंपरी तालुक्यातील चेक सोमनपल्ली शेतशिवारात सोमवारी सायं. ५ वाजेच्या सुमारास शेतातील काम आटोपून बैलांना घेऊन घरी परतणाऱ्या रोजा शिवमोहन उराडे यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातली. वाघाने एका बैलाला ओढून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र बैलांनी धाव घेतल्याने तो प्रयत्न फसला आणि वाघाच्या हल्ल्यात रोजा उराडे गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रॅप कॅमेरे अन् पिंजरा लावण्याची मागणी:
घटनेनंतर वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. आगरझरीतील ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन अडवून वाघाला तातडीने पिंजरा लावून पकडण्याची, परिसरातील कचरा साफ करण्याची आणि शेतीच्या कामासाठी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. बी. शेगावकर, क्षेत्र सहाय्यक ए. पी. तिजारे व सहकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *