LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

पैशाच्या वादावरून श्यामनगर चौकात खुनी थरार! तरुण गंभीर जखमी, दोन आरोपींना अटक

पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला; जखमी तरुणाला उपचारासाठी नागपूरला केले रेफर
 अमरावती :
राजापेठ/फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील काँग्रेस भवनजवळ, काँग्रेसनगर रोड येथे पैशांच्या वादातून पहाटेच्या सुमारास एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. या खुनी हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २.५४ वाजताच्या सुमारास एका इसमावर दोघांनी पैशांच्या वादावरून धारदार शस्त्राने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. शेख सोहेल शेख सलीम (वय ३६, रा. अकोट फाईल, अकोला) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर व शरीरावर शस्त्राचे गंभीर वार झाले आहेत.
प्राथमिक तपासात या हल्ल्यात बादल नारायण बागवाले (रा. महाजनपुरा) आणि हरीश विनोद बोबडे (रा. श्यामनगर, अमरावती) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांनाही तातडीने ताब्यात घेतले आहे. जखमी शेख सोहेल याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात (रेफर) आले आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात बंदोबस्त व गस्त वाढवण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहाय्यक पोलीस आयुक्त नयन अलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या नेतृत्वात डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल महाजन, पोहेकॉ रज्जाक शेकुवाले, नापोकॉ सचिन बोरकर, सूरज यादव, पोकॉ अखिल दळवी, जयेश परीवाले, रोशन व्हाडे, प्रशांत वानखडे, सागर चव्हाण, जावेद पटेल, धर्मा शिंदे, प्रशांत नेवारे व रामकृष्ण चांगोले यांच्या पथकाने केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *