मांडोदेवीत शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
घटस्थापनेला प्रज्वलित होणार २१०० अखंड महाज्योती आ. विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
गोंदिया : विदर्भासह लगतच्या मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या आमगाव तालुक्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान (बघेडा/तेढा) येथे शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान संस्थेचे अध्यक्ष तथा गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर विश्वस्तांची आढावा बैठक पार पडली. यंदा घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरात सुमारे २ हजार १०० अखंड महाज्योती प्रज्वलित केल्या जाणार असून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य डोंगरमाथ्यावर वसलेले स्वयंभू माँ मांडोदेवी देवस्थान हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक समरसतेचे आणि सामूहिक विवाहांचे मोठे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. शारदीय नवरात्रीत गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांसह शेजारील मध्य प्रदेशातील बालाघाट भागातून लाखो भाविक नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी येथे हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर बैठकीत दर्शन रांगा, महाप्रसाद वितरण, पिण्याचे पाणी, अखंड वीजपुरवठा, आरोग्य सेवा आणि वाहनतळ व्यवस्था यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.वाहतूक व्यवस्था व पोहोच मार्गांचे नियोजनकोहमारा–गोंदिया मार्गावरील गोरेगावजवळील मुंडीपार मार्गे, तसेच आमगाव व देवरीकडून मांडोदेवी देवस्थानाकडे थेट येणारे रस्ते उपलब्ध आहेत. उत्सवादरम्यान होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन या सर्व संपर्क मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने विशेष वाहतूक नियंत्रण आराखडा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

भक्तीमय वातावरणात पार पडणार उत्सव : आ. विनोद अग्रवाल”मांडोदेवी मातेच्या दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या एकाही भाविकाला असुविधा होणार नाही, याची मंदिर प्रशासन व स्वयंसेवकांनी दक्षता घ्यावी. घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत संपूर्ण उत्सव अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध व भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत,” असा संकल्प आ. विनोद अग्रवाल यांनी या वेळी व्यक्त केला.या नियोजन बैठकीस देवस्थानचे सचिव डॉ. लक्ष्मण भगत, उपाध्यक्ष भैय्यालाल सिंदराम, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी, सहसचिव कुशनजी घासले, सदस्य डॉ. जितेंद्र मेंढे, शालिकराम उईके, सखाराम सिंदराम, दिलीप खंडेलवाल, राहुल अग्रवाल, नंदकिशोर गौतम, श्याम ब्राह्मणकर, छन्नू काठेवार तसेच मुख्य पुजारी पंडित अयोध्यादासजी महाराज यांच्यासह पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते.

