LatestNewsगोंदियाविदर्भ

महात्मा गांधी जयंती व वन्यजीव सप्ताहानिमित्त नवेगाव वनपरिक्षेत्रात विविध उपक्रम

स्वच्छता अभियानाने कार्यक्रमाचा शुभारंभ
२ ते ८ ऑक्टोबर दरम्यान जनजागृती मोहिमेचे आयोजन
वने व वन्यजीव संवर्धनाचा दिला संदेश
अर्जुनी मोरगाव ( गोंदिया) :
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत (NNTR) वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नवेगाव बांधच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि वन्यजीव सप्ताहाचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला. २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत हा सप्ताह साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त वन्यजीव संवर्धन, मानवी सहजीवन आणि वनांच्या संरक्षणाबाबत जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा शुभारंभ स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उपवनसंरक्षक अतुल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबर रोजी झाली. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सहायक वनसंरक्षक दुर्गे व अविनाश मेश्राम यांच्या नेतृत्वात तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील, पाजारे, हातकर, सौरभ पाऊलझगडे आदी प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वन्यजीव सप्ताहाच्या औपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी उपस्थित वनाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे अस्तित्व किती गरजेचे आहे, यावर सविस्तर प्रकाश टाकला. जंगलांचे संरक्षण, तृणभक्षी व मांसाहारी वन्यप्राण्यांचे मानवी हस्तक्षेपापासून रक्षण आणि अवैध शिकार रोखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य या विषयांवर जनजागृती करण्यात आली.
परिसरात राबविले स्वच्छता अभियान
गांधी जयंतीचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र कार्यालय व लगतच्या जंगल परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. आठवडाभर चालणाऱ्या या सप्ताहात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा आणि वनक्षेत्रात जनजागृती रॅलींचे आयोजन केले जाणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक तसेच विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (STPF) जवानांनी परिश्रम घेतले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *