आमगावात उच्छाद मांडणाऱ्या कुख्यात गुन्हेगारी टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; टोळीप्रमुखासह चौघे २ महिन्यांसाठी हद्दपार!
आमगाव (विशेष प्रतिनिधी): महिलांची छेडछाड, भररस्त्यात वाहनांवर दगडफेक, मारहाण आणि शासकीय कामात अडथळे आणून संपूर्ण आमगाव शहरात दहशतीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या टगे आणि गुन्हेगारांचे कंबरडे मोडत आमगाव पोलिसांनी अत्यंत आक्रमक कारवाई केली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या एका उपद्रवी टोळीच्या म्होरक्यासह चौघांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये गोंदिया जिल्ह्यातून तब्बल दोन महिन्यांसाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे. पोलिसांच्या या दणकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या गुंडांमध्ये टोळीप्रमुख शुभंम अनिल राहुलकर (वय २४, रा. भवभुतीनगर, आमगाव) याच्यासह त्याचे साथीदार मनिष विनोद रहीले (वय २०, रा. भवभुतीनगर), हर्ष दालचंद साठवणे (वय २१, रा. गणेशपूर) आणि कुणाल अनिल राहुलकर (वय १८, रा. भवभुतीनगर) यांचा समावेश आहे. या उपद्रवी टोळीवर महिलांना नाहक त्रास देणे, चोऱ्या करणे, रस्त्यावर वाहने अडवून प्रवाशांना शिवीगाळ व मारहाण करणे, धावत्या वाहनांवर दगडफेक करून दहशत पसरवणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, दारूच्या नशेत धुडगूस घालणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात बेधडक अडथळा निर्माण करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया करूनही या टोळीची गुन्हेगारी वृत्ती आणि माज कमी होत नसल्याने पोलिसांनी अखेर त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी हद्दपारीचा फास आवळला. जिल्हा प्रशासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी या चौघांना ताब्यात घेऊन थेट शेजारच्या छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे नेऊन सोडले. आमगाव परिसरात आता त्यांच्या प्रवेशावर दोन महिने सक्त बंदी घालण्यात आली असून, जिल्ह्यात दिसल्यास थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदिनी चानपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमगावचे पोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगणजुडे, सफौ दुबेलाल उईके, पोहवा राजू गजपुरे, खुशाल बर्वे, असीम मन्यार, मपोहवा यशोदा नाईक, पोशि राहुल बिसेन, गौरव बुराडे, तेजलाल उईके, अजयकुमार पटले, छगन विठ्ठले व मपोशि विनिशा बहेकार यांनी पार पाडली. सर्वसामान्यांच्या शांततेशी खेळणाऱ्या गुंडांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे.

