‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ३२ लाखांची देशव्यापी फसवणूक; तिरोड्यात सायबर टोळीचा पर्दाफाश
११५ सिमकार्ड ॲक्टिव्हेट करून टेलिग्रामद्वारे विकले : मुख्य आरोपी सचिन सरोदेला बेड्या, २ विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही सहभाग
तिरोडा/गोंदिया : गोंदिया व तिरोडा परिसरातील निष्पाप नागरिकांच्या कागदपत्रांवरून तब्बल ११५ सिमकार्ड सक्रिय करून ते टेलिग्रामच्या माध्यमातून सायबर चोरांच्या टोळीला विकणाऱ्या रॅकेटचा गोंदिया सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. या सिमकार्ड्सचा गैरवापर करून देशभरातील नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल ३२ लाख २२ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी सचिन सरोदे याला अटक करण्यात आली आहे, तर दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सायबर सेल गोंदियाचे सपोउपनि राजेश शंकर शेंद्रे यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी गोंदिया ते तिरोडा परिसरातील सर्वसामान्य ग्राहकांकडून सिमकार्ड प्राप्त केले होते. त्यांनी विशिष्ट मोबाईल हँडसेटचा वापर करून तब्बल ११५ सिमकार्ड सक्रिय केले व त्यातील काही सिमकार्ड ई-सिमकार्डमध्ये (e-SIM) रूपांतरित केले. सिमकार्ड सक्रिय झाल्यानंतर कार्तिक इंगळे याने टेलिग्रामवरील ‘सिमचॅट ॲण्ड डिल्स’ (Simchat and Deals) नावाच्या ग्रुपमध्ये ई-सिमकार्डचे क्यूआर कोड शेअर केले आणि प्रत्यक्ष फिजिकल सिमकार्ड कुरिअरच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांच्या टोळीला पाठवून दिले. या सिमकार्ड्स व मोबाईल क्रमांकांचा वापर करून आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांनी देशभरातील नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात ओढले आणि त्यांची एकूण ३२ लाख २२ हजार रुपयांची भलीमोठी आर्थिक लूट केली.
तिरोडा पोलिसांत गुन्हा; मुख्य आरोपी गजाआड
या गंभीर सायबर गुन्ह्याप्रकरणी आरोपी सचिन रंजित सरोदे (वय २२ वर्षे, रा. संत कबीर वॉर्ड, तिरोडा, जि. गोंदिया) आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात अपराध क्र. ९६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४), ३१९, ६१(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) २००० च्या कलम ६६(सी), ६६(डी) आणि दूरसंचार अधिनियमाच्या कलम ४२(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सचिन सरोदे याला ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १.४७ वाजता अटक केली आहे. या आंतरराज्यीय टोळीत सहभागी असलेल्या इतर सायबर गुन्हेगारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे (कॅम्प देवरी), तिरोडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित वानखडे, सपोनि देविदास ठमके, स.फौ. राजेश शेंद्रे, पो.हवा. दीपक खांडेकर, पो.शि. धनंजय बारई आणि पो.शि. सचिन मेश्राम यांनी केली आहे.

