दुचाकी चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; १८ दुचाकींसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कामगिरी : गोंदिया, नागपूरसह मध्य प्रदेश व छत्तीसगडमधून पळवल्या होत्या गाड्या; ४ आरोपी गजाआड
गोंदिया : गोंदिया शहर व लगतच्या जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्यीय दुचाकी चोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीतील चार सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तब्बल १८ दुचाकींसह ८ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे गोंदिया जिल्ह्यातील ७, नागपूर शहरातील ७, मध्य प्रदेशातील ३ आणि छत्तीसगडमधील १ असे एकूण १८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, २६ सप्टेंबर रोजी तिरोडा येथील ट्रेझरी ऑफिसच्या मागून सचिन पटले यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय १७ व २५ सप्टेंबर रोजी आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही होंडा शाईन व ॲक्टिव्हा चोरीला गेल्याची नोंद झाली होती. जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे निर्देश दिले होते.
गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणातून सुगावा
एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत असताना गोपनीय बातमीदार आणि सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणावरून महत्त्वाची माहिती मिळाली. अंगूर बगीचा गोंदिया येथील राहुल उर्फ चंगा लिल्हारे हा त्याच्या साथीदारांसह विविध भागांतून दुचाकी चोरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून राहुल लिल्हारे याला ताब्यात घेतले. त्याची कसून विचारपूस केली असता त्याने साथीदारांसह मिळून आमगाव, तिरोडा, खमारी, सिव्हिल लाईन (गोंदिया), नागपूर शहर तसेच मध्य प्रदेशातील किरणापूर येथून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या टोळीतील राहुल उर्फ चंगा सूकचंद लिल्हारे (वय २६, रा. टीचर कॉलनी, अंगूर बगीचा, गोंदिया), जय उर्फ बॉबी राजेश पाटील (वय २७, रा. बर्फ फॅक्टरी जवळ कटंगीकला, ह.मु. अंभोरा), सुरजसिंग ग्यानीराम सावंत (वय ३५, रा. दवनीवाडा) आणि अमित अशोक लिल्हारे (वय २७, रा. दवनीवाडा, जि. गोंदिया) या चौघांना अटक केली आहे. आरोपींनी विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या विविध कंपन्यांच्या एकूण १८ दुचाकी (किंमत रु. ८,०१,०००/-) पोलिसांनी जप्त केल्या. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींसह मुद्देमाल गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, पोलीस अंमलदार संजय चौहान, दिक्षितकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, इंद्रजित बिसेन, सोमेंद्रसिंह तुरकर, रियाज शेख, भोजराज बहेकार, विठ्ठल ठाकरे, राजकुमार खोटेले, सुजित हलमारे, छगन विठ्ठले, हंसराज भांडारकर, कुणाल बारेवार, राम खंदारे, विलेश ठाकरे, इम्रान सय्यद तसेच सायबर सेलचे सपोनि देविदास ठमके, योगेश राहिले व अश्विन वंजारी यांनी केली.

