राष्ट्रीय महामार्गावर सौंदड ते डुग्गीपार वाहनांच्या लांबच लांब रांगा; सलग ४ तासांपासून वाहतूक ठप्प!
वारंवार बंद होणारे रेल्वे गेट अन् कोहमारात ट्रकाचा थरार; प्रवासी, वाहनचालकांचा प्रचंड मनस्ताप
सडक अर्जुनी (गोंदिया) : रायपूर ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदड रेल्वे गेट परिसरात पुन्हा एकदा वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला आहे. आज दुपारी ३ वाजेपासून सलग चार तासांहून अधिक काळ महामार्गावरील जड वाहने आणि प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे सौंदडपासून ते थेट डुग्गीपारपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहनचालकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
सौंदड येथील रेल्वे पुलाचे बांधकाम गेल्या ५ वर्षांपासून संथ गतीने सुरू असून ते अद्यापही अपूर्णच आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून २४ तास जड वाहने व प्रवाशांची मोठी ये-जा सुरू असते. नेहमीच १० ते १५ मिनिटे रेल्वे गेट बंद राहिले तरी सुमारे ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.

रेल्वे गाड्यांची संख्या अन् कोहमारात ट्रक अडकल्याने कोंडीत भर!
आज रेल्वे मार्गावरून मालगाड्या आणि प्रवासी रेल्वे गाड्यांची आवक-जावक अधिक असल्याने वारंवार रेल्वे गेट बंद ठेवावे लागले. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत आज वाहतुकीचा खोळंबा अधिकच वाढला. त्यातच भर म्हणून, राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा टी-पॉइंटजवळ (GJ 03 BT 12) क्रमांकाच्या एका ट्रक चालकाने रस्ता ओलांडण्याच्या घाईत आपले वाहन थेट दुभाजकावर (डिवायडर) चढवून आडवे केले. यामुळे महामार्गावरील रस्ता पूर्णपणे अडवला गेला आणि आधीच विस्कळीत झालेली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
प्रवाशांचे प्रचंड हाल; पूल तातडीने पूर्ण करण्याची मागणी
चार-चार तास वाहने एकाच जागी थांबून राहिल्याने हजारो किलोमीटरचा लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे, महिलांचे व लहान मुलांचे अतोनात हाल झाले. महामार्गावर बसेस, कार, ट्रक आणि इतर चारचाकी वाहनांची कित्येक किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे संतप्त झालेल्या वाहनचालकांनी व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र मनस्ताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने सौंदड येथील पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून या नित्यनियमाच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी केली जात आहे.

