LatestNewsगोंदिया

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी येथे विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाही प्रक्रिया

ईव्हीएमद्वारे मतदान करून विद्यार्थ्यांनी निवडले शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ
सडक अर्जुनी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी येथे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ईव्हीएम (मतदान यंत्र) द्वारे मतदान करून लोकशाही प्रक्रियेचा अनोखा आणि प्रेरणादायी अनुभव घेतला.


निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी शाळेत नियोजनबद्ध प्रचार केला. विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले व आपल्या सहाध्यायांसमोर भूमिका मांडल्या. त्यानंतर शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर मतमोजणी करून विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
या निवडणुकीत शाळा नायक पदासाठी कृतिका ओमप्रकाश बोपचे यांनी विजय मिळविला, तर शाळा उपनायक म्हणून चैतन्य नितेश बहेकार यांची निवड झाली. विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून रुची रवींद्र उके यांची निवड करण्यात आली. सांस्कृतिक प्रमुख म्हणून साची विनोद कांबळे व ईशानी राजू गजभिये, क्रीडा प्रमुख म्हणून दीपेश दिलीपकुमार मेंढे, मयूर राजू वाढवे व नयन अरविंद बहेकार, परिपाठ प्रमुख म्हणून निधी विनोद कांबळे, युग हवनलाल लटये, नैन्सी दिलीपकुमार कांबळे व मयंक जितेंद्र बावणे, तसेच स्वच्छता प्रमुख म्हणून नैतिक चिंतामण राऊत, आदिती विश्वनाथ उके, युग राजेश रहांगडाले, कुलदीप राजेश सोनवाणे व लुमेश अनिल नेवारे यांनी भरघोस मतांनी विजय संपादन केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, लोकशाहीची मूलतत्त्वे, जबाबदार नागरिकत्व, नेतृत्वगुण आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मतदानात सहभाग घेतल्याने संपूर्ण वातावरण लोकशाहीच्या उत्सवात रंगून गेले.
या शालेय निवडणुकीत मुख्याध्यापक किशोर बी. डोंगरवार , राजेशकुमार सोनवाणे , जितेंद्र कवरे , धम्मदीप साखरे , भुवन बागडे , शामा कुंडगीर ,माया तांदळे यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळाला. शालेय स्तरावर लोकशाहीचे संस्कार रुजविणारा आणि भविष्यातील जबाबदार नागरिक घडविणारा हा अभिनव उपक्रम उपस्थित पालक व ग्रामस्थांसह सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *