LatestNewsगोंदियाविदर्भ

मच्छीमार संस्थेच्या सभासद नोंदणीसाठी ढिवर समाजाचा एल्गार

प्रहारच्या नेतृत्वात संयुक्त लक्षवेधी आंदोलन
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
गोंदिया :
तिरोडा तालुक्यातील गांगला मागासवर्गीय मच्छीमार सहकारी संस्थेत (नोंदणी क्र.१०१) हक्काच्या सभासद नोंदणीसाठी कोडेलवारा येथील ढिवर समाजातील मच्छीमार बांधवांनी कोडेलवारा तलावाच्या पाळीवर ठिय्या मांडून संयुक्त लक्षवेधी आंदोलन छेडले. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वात २९ सप्टेंबर रोजी हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास सहकार मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. मात्र, पोलीस व महसूल प्रशासनाने वेळीच मध्यस्थी करत वरिष्ठ अधिकार्‍यांना पाचारण केल्याने आणि ३ ते ४ महिन्यांत कायदेशीर बाबी पूर्ण करून सभासद नोंदणी करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
कोडेलवारा येथील ढिवर समाजातील मच्छीमारांची गांगला मच्छीमार संस्थेत सदस्य नोंदणी मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होती. न्याय्य हक्कासाठी सकाळी ११ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पोलीस बंदोबस्तात शांततेच्या मार्गाने आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात गावातील ढिवर समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत प्रशासनाकडून मागण्यांची दखल न घेतल्यास ५ वाजता सहकार मंत्र्यांचा पुतळा दहन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आल्याने आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
वाढता तणाव लक्षात घेऊन पोलीस अधिकारी व तहसीलदारांनी तात्काळ सूत्रे हलविली. त्यांनी सहाय्यक आयुक्त (मत्स्यपालन) मारबदे आणि सहाय्यक दुय्यम निबंधक (दुग्ध, भंडारा) शहारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना थेट आंदोलनस्थळी येण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अवघ्या दीड तासात दोन्ही विभागांचे वरिष्ठ अधिकारी कोडेलवारा तलावावरील आंदोलन मंडपात दाखल झाले. अधिकारी, प्रहारचे पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संस्थेच्या कायदेशीर व तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा झाली. या वेळी काही काळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. मात्र, अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून येत्या तीन ते चार महिन्यांत पात्र मच्छीमारांची सभासद नोंदणी पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट लेखी पत्र सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातर्पेâ देण्यात आले. तसेच आचारसंहिता संपताच नियमानुसार संस्थेची तांत्रिक तपासणी करण्यात येईल, असे लेखी पत्र मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त मारबदे यांनी दिले. या ठोस लेखी आश्वासनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला सभासद नोंदणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या आंदोलनात प्रहारचे जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, तालुका मीडिया प्रमुख मिथुन वासनिक, रुग्णसेवक लकेश तुमसरे, कोडेलवाराचे सरपंच भगत, विनोद कोंबडे, रंगलाल मारबदे, हेमराज मारबदे, पुरुषोत्तम मेश्राम, अरविंद कोंबडे यांच्यासह ढिवर समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *