LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

बघेडा परिसरात चंदन तस्करीचा पर्दाफाश; वन विभागाची धाड, चंदनाचे लाकूड जप्त!

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील कारवाई; १२१ किलो चंदनाचे लाकूड हस्तगत
तुमसर / नाकाडोंगरी : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील बघेडा येथे चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून चंदनाची तस्करी करण्याचा प्रयत्न वन विभागाने यशस्वीरीत्या उधळून लावला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बघेडा येथील लक्ष्मण अशोक नागपुरे यांच्या राहत्या घरी अचानक धाड टाकून झडती घेण्यात आली. या कारवाईत चंदन प्रजातीचे लाकूड व साहित्य हस्तगत करून जप्त करण्यात आले.
बघेडा परिसरातील एका शेताच्या बांधावर चंदनाची सुमारे दहा ते बारा झाडे असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यापैकी दोन झाडे मुळासकट उपटण्यात आल्याचे निदर्शनास आले. गुप्त माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके यांनी तत्काळ पथकासह शेतशिवारात धाव घेतली. घटनास्थळी पाहणी करून कापलेली चंदनाची झाडे व संबंधित साहित्य वन विभागाने ताब्यात घेतले. उर्वरित आठ ते दहा चंदनाची झाडे सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. वन विभागाच्या पथकाने कापलेल्या चंदनाच्या झाडांचा पंचनामा केला.
या झडतीदरम्यान घरातून चंदन प्रजातीचे १२१ किलो लाकूड आढळून आले. जप्त लाकूड व चंदन ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध वन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात आली. लक्ष्मण नागपुरे हा व्यक्ती नागपूर व रामटेक येथे चंदनाच्या खोडांची विक्री करीत होता, अशी माहिती पुढे आली आहे.
चंदनाच्या झाडांवर वन विभागाची नजर
बघेडा परिसरात चंदनाच्या झाडांची अवैध तोड होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने तातडीने केलेल्या कारवाईमुळे उर्वरित झाडे सुरक्षित राहिली आहेत.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके यांच्या नेतृत्वाखाली, गडेगाव आगाराचे वन विभागातील निष्कासन अधिकारी रितेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत करण्यात आली. या संयुक्त कारवाईत क्षेत्र सहाय्यक (बघेडा) जगदीश बेले, क्षेत्र सहाय्यक (चिचोली) दक्षिण त्र्यंबक घुले, बीटरक्षक दीपम उईके, कविता मेश्राम, राजकुमार कुंभरे यांच्यासह ओ. एन. मोरे, एम. के. सूर्यवंशी आणि इतर वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *