LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदिया जिल्ह्यात १ लाख ६० हजार मतदार पडताळणीत बेपत्ता

२८ हजार ३७६ मतदारांना बजावली नोटीस
घरी न आढळल्यास व्हॉट्सॲपवर संदेश :
गोंदिया :
भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) राबविण्यात आलेल्या व्यापक मोहिमेत गोंदिया जिल्ह्यातील तब्बल १ लाख ६० हजार मतदार जागेवर आढळून आलेले नाहीत. त्यामुळे अशा सर्व संशयित मतदारांना निवडणूक विभागामार्फत नोटिसा बजावण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २८ हजार ३७६ मतदारांना बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावल्यानंतर त्यांची रीतसर सुनावणी घेतली जाईल आणि त्यानंतरच नावे वगळण्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात एकूण ११ लाख २३ हजार ६५६ नोंदणीकृत मतदार असून ‘एसआयआर’ अंतर्गत या सर्व मतदारांची कसून पडताळणी करण्यात आली. या मोहिमेत धक्कादायक बाबी समोर आल्या असून, तब्बल ४९ हजार मतदार मृत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय ७० हजारांहून अधिक मतदार स्थलांतरित झाले असून, १७ हजार मतदारांच्या नावांमध्ये व नोंदींमध्ये मोठी विसंगती आढळून आली आहे. पडताळणीत जागेवर न सापडलेल्या एकूण ९० हजार १६० मतदारांना निवडणूक विभागाकडून टप्प्याटप्प्याने नोटिसा बजावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आणखी ७० हजार मतदारांना नोटीस बजावणार
जिल्हा निवडणूक शाखेकडून सध्या नोटिसा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत २८ हजार ३७६ मतदारांना नोटीस पोहोचविण्यात आली असून, उर्वरित ७० हजार ४७४ संशयित मतदारांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून या नोटिसा तहसील कार्यालयांकडे पाठविल्या जात असून, तेथून त्या बीएलओंकडे सुपूर्द केल्या जात आहेत. बीएलओ प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन नोटीस देत आहेत. जे मतदार घरी उपलब्ध होत नाहीत, त्यांना व्हॉट्सॲपवर नोटीस पाठविली जात असल्याची माहिती बीएलओ प्रमोद खोटले यांनी दिली.
पुरावे देऊनही नोटीस आल्यास गोंधळू नका : प्रशासनाचे आवाहन
दरम्यान, काही मतदारांनी मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे संबंधित बीएलओकडे वेळेत जमा केले होते. तरीही त्यांना नोटीस मिळाल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत निवडणूक विभागाकडे विचारणा केली असता, संबंधित मतदारांनी कागदपत्रे उशिराने जमा केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ज्या मतदारांनी पुरावे दिले आहेत, त्यांनी नोटीस मिळाली तरी घाबरून किंवा गोंधळून जाऊ नये, असे आवाहन सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *