LatestNewsUncategorizedगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

mla Rohit pawar; महायुतीचे सरकार ‘गजनी’-आमदार रोहित पवार यांची टीका

भंडारा- विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धानाला बोनस, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह अनेक आश्वासने दिली. मात्र सत्तेवर येताच त्यांना या सर्व गोष्टींचा विसर पडतो. आपल्या सोयीप्रमाणे ते दिलेला शब्द विसरतात. राज्यातील महायुतीचे हे ‘गजनी सरकार’ आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे आमदार रोहित पवार यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या मंडल यात्रेसोबत शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांवरून बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भरपावसात निघालेल्या या मोर्चात आमदार पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,ओबीसी आघाडी प्रदेशाध्यक्ष राजा राजपुरकर, माजी आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे,युवा नेते रविकांत बोपचे यांची प्रमुख उपस्थिती होती.मोर्चाचा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नारेबाजी, घोषवाक्ये आणि डफड्यांच्या दणदणाटाने गरजला होता. ढगांचा गडगडाट आणि पावसाचा जोरही मोर्चातील उत्साहाला आडकाठी ठरला नाही. बैलगाडीवर बसलेले रोहित पवार आणि माजी आ. चरण वाघमारे उपस्थित लोकांचे लक्ष वेधत होते. रोहित पवार हात दाखवून उपस्थिताना अभिवादन करत होते, तर शेतकऱ्यांनी घोषवाक्यांसह मागणी मांडली. उत्स्फूर्त सहभाग मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी, महिला, तरुण-तरुणी उपस्थित होते. पारंपरिक डफड्यांचा दणदणाट, घोषवाक्यांची गजर आणि ढगांचा गडगडाट मोर्चाच्या उत्स्फूर्त वातावरणाला अजूनच जिवंतपणा देत होता. पावसातही शेतकऱ्यांची उपस्थिती आणि उत्साह पाहता प्रत्येक घटकातील नागरिकांनी हक्कांसाठी आवाज उंचावला.आमदार पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धानाला बोनस, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना मोफत वीज आदी आश्वासने दिली होती. सत्तेवर येताच त्यांनी रंग बदलले. आता म्हणतात शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठीत करणार तर धानाला बोनस देताना अनेक अटी व नियम लावण्यात आले. शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आश्वासन या सरकारने दिले. मात्र पीक विमा कंपनीच्या हिताचा कायदा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करण्यात आला. लाडक्या बहिणींना १,५०० ऐवजी २,१०० देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. मात्र आता अनेक लाडक्या बहिनींना या योजनेतून वगळण्यात आल्याचा दावाही आमदार पवार यांनी केला. मोर्चा कार्यालयावर जिल्हाधिकारी धडकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *