LatestNewsविदर्भ

भद्रावतीत एसीबीचा दणका! २० हजारांची लाच घेताना वनपाल, वनरक्षक अन् वनमजूर रंगेहात जाळ्यात

जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी मागितली होती लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने वनविभागात खळबळ
भद्रावती (चंद्रपूर):
जप्त केलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आणि तो सोडण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेताना भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक (वनपाल), बीट वनरक्षक आणि एका वनमजुराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी रंगेहात अटक केली. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे वनविभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. क्षेत्र सहाय्यक कोमल घुगलोत, बीट वनरक्षक संदीप पारवे आणि वनमजूर ललित नागपुरे अशी लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मांगली क्षेत्रात अवैध रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर वनविभागाने जप्त करून कार्यालय परिसरात लावून ठेवला होता. हा ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि ट्रॅक्टर मालकावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी क्षेत्र सहाय्यक कोमल घुगलोत आणि बीट वनरक्षक संदीप पारवे यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने ट्रॅक्टर मालकाने याप्रकरणी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयात नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम वनमजूर ललित नागपुरे याच्याकडे सुपूर्द करण्यात आली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहात पकडले. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर एसीबीचे पथक करत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *