गोटाबोडी-आमगाव मार्गावर अपघाताचे तांडव
बांधकाम विभागाची संवेदना हरपली
जनतेचा तीव्र संताप
देवरी : तालुक्यातील गोटाबोडी ते आमगाव (आदर्श) हा मार्ग आता रस्ता राहिला नसून तो जीव घेणारा ‘यमदूत’ झाला आहे. कित्येक वर्षांपासून या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून धृतराष्ट्र बनून बसले आहेत. एखादा मोठा अपघात होऊन जीव गेल्यावर संवेदना हपलेल्या प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यामुळे विकासाचे प्रतिक ठरण्याऐवजी गोटाबोडी-आमगाव रस्ता नागरिकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे.
गोटाबोडी ते आमगाव (आदर्श) हा मार्ग दुरवस्थेला गेला आहे. रस्त्याची चाळण झाली असून रहदारी करणे कठीण झाले आहे. एकेकाळी शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेल्या या रस्त्याचे आज तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यावरील डांबराचा मागमूसही उरलेला नाही. त्याऐवजी रस्त्यावर पसरलेली अणकुचीदार गिट्टी वाहन धारकांसाठी साक्षात यमदूत ठरत आहे. खड्ड्यांचे साम्राज्य इतके भयानक आहे की, खड्ड्यांत रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रस्ता शोधण्यासाठी आता अक्षरशः भिंग घेऊन फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दुचाकीस्वारांचे घसरून पडणे, रक्तबंबाळ होणे आणि वाहनांचे नुकसान होणे, ही तर आता रोजचीच डोकेदुखी झाली आहे. हा मार्ग घनदाट जंगलातून जात असल्याने रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचा वेग अत्यंत संथ असतो, त्यातच खड्ड्यांमुळे वाहन नादुरुस्त झाल्यास भर जंगलात वन्यप्राण्यांच्या दहशतीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. गोटाबोडी ते आमगाव (आदर्श) या मार्गाची तात्काळ युद्धपातळीवर डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे पुन्हा पाठ फिरवल्यास रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
…………………..
आपत्कालीन परिस्थितीत जीवघेणा प्रवास
रस्त्याच्या दुरवस्थेला घेवून क्षेत्रातील जनतेची कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत रस्ता दुरूस्तीला घेवून आक्रोश वाढत आहे. परंतु, दुर्लक्ष केले जात आहे. अतिशय गंभीर बाब म्हणजे, आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा एखाद्या गर्भवती महिलेला या रस्त्यावरून रुग्णालयात नेणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यास याची जबाबदारी प्रशासन घेणार का? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अक्षम्य आणि जीवघेण्या दुर्लक्षामुळे परिसरातील जनतेमध्ये संतापाचा ज्वालामुखी खदखदत आहे.

