LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

दोन जणांचा बळी घेणारी टी-६१ वाघीण अखेर जेरबंद; वन विभागाची मोठी कारवाई!

मिंडाला उप-क्षेत्रातील कक्ष क्रमांक ८७ पी मध्ये पडली पिंजऱ्यात
चंद्रपूर : मागील २५ दिवसांत दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या टी-६१ एसएएफ वाघिणीला शुक्रवारी वन विभागाने यशस्वीरीत्या पिंजराबंद केले. मिंडाला उप-क्षेत्रातील कक्ष क्रमांक ८७ पी परिसरात या वाघिणीला पकडण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी व आरआरटी प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डार्ट तयार केला, ज्याचा वापर करून शूटर अजय मराठे यांनी टी-६१ एसएएफ वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध केले.
मिळालेल्या माहितीनुसार, या वाघिणीने ११ मे २०२६ रोजी किटाळी मेंढा येथील एफडीसीएम कक्ष क्रमांक २१९ मध्ये वनिता उडके यांच्यावर, तर ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास जनकापूर येथील ५४ वर्षीय रमेश काशीवार यांच्यावर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. रमेश काशीवार हे स्वतःच्या शेत गट क्रमांक १६८ मध्ये काम करत असताना वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला होता.
मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी कारवाई
या वाघिणीचा शेतात आणि गावाभोवती सातत्याने वावर असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. यापूर्वीही या परिसरात वाघिणीने मानव आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये वन विभागाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भविष्यातील मानव-वन्यजीव संघर्षाची कोणतीही दुर्दैवी घटना टाळण्यासाठी टी-६१ (मादा) वाघिणीला पकडणे अत्यंत आवश्यक बनले होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *