शिक्षक समितीच्या लढ्याला मोठे यश; आमदार विनोद अग्रवाल व उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता
प्रशासनाने दिले लेखी आश्वासन; प्रलंबित मागण्या २० एप्रिलपर्यंत मार्गी लागणार
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला अखेर प्रशासकीय आश्वासनानंतर यश आले आहे. शिक्षकांच्या सर्व प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. शिक्षक समितीच्या आक्रमक आणि खंबीर भूमिकेमुळे प्रशासनाला नमते घेऊन तातडीने निर्णय घ्यावा लागला.या आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी पुढाकार घेत प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षक नेत्यांमध्ये समन्वयाची भूमिका बजावली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी फणींद्र कुतीरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे, शिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, विस्तार अधिकारी नरेंद्र डहाके आणि प्रशासन अधिकारी सौरभ अग्रवाल यांच्यासोबत उपोषणस्थळी सुमारे दोन तास सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवत लेखी आश्वासन दिले. दरम्यान, गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन शिक्षकांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शिक्षकांच्या हितासाठी तात्काळ निर्णय घेण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या.या आंदोलनामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये S-14 चा लाभ ६ ऑगस्ट २००२ पासून देणे, १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी व २४ वर्षांनंतर निवडश्रेणी लागू करणे, तसेच आदिवासी उपयोजन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देणे यांसारख्या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय पदवीधर विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणी प्रस्तावाला गती देणे, २३ महिन्यांच्या घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी निधीची मागणी करणे आणि प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन होईल याची खात्री करणे, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. १७६ शिक्षकांचे GPF अपडेट करणे आणि आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या NPS व निवडश्रेणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचेही लेखी पत्रात नमूद करण्यात आले आहे.प्रशासनाने २० एप्रिलपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे शिक्षक समितीने आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. तीव्र उन्हाची तमा न बाळगता शेकडो शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. या यशाबद्दल शिक्षक समितीने आमदार विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष सुरेश हर्षे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, किशोर डोंगरवार, वितेश खांडेकर, संदीप मेश्राम, ममता येडे, शरद पटले, मुकेश रहांगडाले यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

