LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

बाईकस्वाराला वाचविण्याच्या नादात महिला मजुरांचा मेटाडोअर उलटला; १४ महिला जखमी, ७ गंभीर

मौदा तालुक्यातील मांगली-सुंदरगाव वळणावरील अपघात
भंडारा :
समोरून अचानक आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात महिला शेतमजुरांनी भरलेला भरधाव मेटाडोअर रस्त्यावर उलटल्याची भीषण दुर्घटना घडली. हा अपघात नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यांतर्गत मांगली (तेली) ते सुंदरगाव दरम्यानच्या एका तीव्र वळणावर घडला. या अपघातात मेटाडोअरमधील १४ महिला मजूर जखमी झाल्या असून, त्यापैकी ७ महिलांचे हात-पाय फ्रॅक्चर झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. इतर ७ महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे की, सध्या मौदा परिसरात मिरची तोडणीचा हंगाम सुरू असल्याने भंडारा जिल्ह्यातून दररोज मोठ्या संख्येने महिला मजूर कामासाठी जातात. भंडारा तालुक्यातील सुरेवाडा गावातून सुमारे ३० महिला मजुरांना घेऊन मेटाडोअर (क्रमांक एमएच-३६/एए-४७२२) मांगली (तेली) शिवाराकडे जात होता. मांगली आणि सुंदरगाव दरम्यानच्या तीव्र वळणावर अचानक समोरून एक दुचाकी आली.
चालकाचे नियंत्रण सुटले; घटनास्थळी आक्रोशाचे वातावरण
दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या गडबडीत गोपीवाडा येथील मेटाडोअर चालक मिथुन वसंता भाविक (वय ३४) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव मेटाडोअर थेट रस्त्यावरच कलंडला. वाहन उलटताच महिला मजुरांमध्ये एकच आरडाओरड आणि आक्रोश सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहनात अडकलेल्या जखमी महिलांना बाहेर काढून उपचारासाठी पाठविले.
जखमींवर मौदा रुग्णालयात उपचार सुरू
सर्व १४ जखमी महिलांना तातडीने मौदा येथील ब्लेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. आशिष सावरकर व त्यांच्या वैद्यकीय पथकाने जखमींवर प्राथमिक उपचार सुरू केले. गंभीर जखमी असलेल्या ७ महिलांवर विशेष देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. वाहन मालक गोपीवाडा येथील प्रदीप रामदास बारई (वय ३२) याने जखमींच्या उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.
जखमींमध्ये या महिलांचा समावेश :
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सुरेवाडा येथील सविता धर्मेंद्र गजभिये (५०), दमयंता सारवन सुखदेवे (६०), शामलता प्रकाश मडामे (३२), ज्योती अखिल गजभिये (२४), सत्यलीला हेमराज पंधरे (५०), वंदना आदेश सुखदेवे (४१), भाग्यश्री सुभाष मडामी (३२), कल्याणी विलास मेश्राम (२२) आणि अर्चना उत्तम क्षीरसागर (५०) यांच्यासह अन्य महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी मौदा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *