LatestNewsPoliticsगोंदिया

गोंदिया विधानसभेतून ५७ हजार बोगस मतदार वगळले; काँग्रेसच्या बीएलए कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे : माजी आमदार गोपालदास अग्रवाल

पुन्हा बोगस नावे घुसवण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा; गोंदिया जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जाहीर न करणे अन्यायकारक
सोमवारी तहसील कार्यालयावर धडकणार काँग्रेसचा भव्य मोर्चा

गोंदिया : राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) गोंदिया विधानसभा मतदारसंघातील तब्बल ५७ हजार बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तात्पुरत्या यादीतून ही नावे वगळली असली, तरी सत्तेवर बसलेले गद्दार पुन्हा मोठ्या प्रमाणावर फॉर्म नंबर ६ भरून बोगस मतदारांची नोंदणी करण्याचा आणि काँग्रेसच्या पात्र मतदारांची नावे फॉर्म नंबर ७ भरून वगळण्याचा डाव आखत आहेत. त्यामुळे पक्षाच्या सर्व बूथ लेव्हल एजंट (बीएलए) कार्यकर्त्यांनी अत्यंत सतर्क राहून हा प्रयत्न हाणून पाडावा, असे जोरदार आवाहन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
गोंदिया तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (SIR) आढाव्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर वराडे, तालुकाध्यक्ष तथा माजी जि.प. सभापती रमेश अंबुले आणि शहराध्यक्ष सचिन शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मतदार याद्यांत प्रचंड फेरफार
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोपालदास अग्रवाल म्हणाले की, गोंदिया विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत ३ लाख २५ हजार मतदार होते. त्यापैकी पडताळणीअंती ५७ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून, सुमारे २४ हजार मतदार अजूनही प्रशासनाच्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. यावरून मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे स्पष्ट होते. विरोधक मतचोरीच्या जोरावर पुन्हा गोंदियावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर करडी नजर ठेवावी, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवणे दुर्दैवी
पुढे बोलताना अग्रवाल यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील ३५८ पैकी २५० तालुक्यांना सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केले; मात्र गोंदिया जिल्ह्यात केवळ तिरोडा तालुक्याला दुष्काळग्रस्त करून उर्वरित सात तालुक्यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले. गोंदिया तालुक्यातील एकोडी, दवनीवाडा, महालगाव, मुरदाडा येथे दुष्काळ नाही आणि लगतच्या तिरोडा तालुक्यातील परसवाडा व बरबसपुरा येथील शेतकरी दुष्काळग्रस्त कसा होतो, असा संतप्त सवाल त्यांनी केला. सरकार दुष्काळ घोषित करण्यात आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यातही पक्षपाती राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सोमवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अमर वराडे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभारावर कडाडून टीका केली. मतदार यादीतील फेरफार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, संपूर्ण गोंदिया जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावे आणि यंदाच्या खरीप पिकांना तातडीने बोनस द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार, २८ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर काँग्रेसतर्फे भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला नगरसेवक प्रफुल गोपालदास अग्रवाल, अशोक (गप्पु) गुप्ता, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजकुमार (पप्पू) पटले, जहीरभाई अहमद, नगरसेवक राकेश ठाकूर, शिलुताई राकेश ठाकूर, संगीताताई अशोक गुप्ता, ज्योतीताई फुंडे, अमर रंगारी, चंद्रकुमार चुटे, सुनील तिवारी, रुपेश नशिने, सुनील भालेराव, देवा रुसे, बेबीनांदा मामा बन्सोड, क्रांतीकुमार जायसवाल, अजयकुमार अग्रवाल, संध्या उत्तम यादव, विजय रगडे, व्यंकट पाथरु, शकील मन्सुरी, सुरेखाताई भांडारकर, रेवतीताई दगडे, लालसिंग पंधरे, चैनलाल लिल्हारे, चेतनभाऊ बहेकार, गोल्डी गावंडे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष अमन तिगाला, संदिप रहांगडाले, सोनूभाऊ घरडे, इक्बाल भाई, गौरव बिसेन यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *