नगरधन येथील तलावात अंघोळीसाठी गेलेले ३ हमाल कामगार बुडाले दोघांचे मृतदेह बाहेर काढले, एकाचा शोध सुरू
रामटेकजवळील राईस मिलमागील घटना
रामटेक (नागपूर ) : रामटेक-मौदा मार्गावर असलेल्या नगरधन शिवारातील ‘मोहनलाल शंकरलाल ॲग्रो फूड्स प्रा. लि.’ या राईस मिलच्या मागील तलावात अंघोळीसाठी उतरलेले तीन तरुण हमाल कामगार खोल पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेत दोन कामगारांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून, एका बेपत्ता कामगाराचा शोध सुरू आहे. हे तिन्ही मजूर बिहार राज्यातील रहिवासी होते.
गुलशन कुमार मंडल (वय २०, रा. पूर्णिया, बिहार) आणि रुपेश कुमार शर्मा (वय १८, रा. खगडिया, बिहार) अशी मृत मजुरांची नावे असून, मनीष कुमार मंडल (वय १८, रा. पूर्णिया, बिहार) हा अद्याप बेपत्ता आहे.
सविस्तर वृत्त असे की, बिहार येथील कंत्राटदार प्रशांत कुमार यांच्या माध्यमातून हे तिघेही गेल्या २०-२२ दिवसांपासून नगरधन येथील राईस मिलमध्ये हमालीचे काम करण्यासाठी आले होते. राईस मिलमधील पाण्याची मोटार गेल्या दोन दिवसांपासून नादुरुस्त असल्याने कामगारांना अंघोळीसाठी पाणी उपलब्ध नव्हते. शनिवारी सकाळची कामाची पाळी (शिफ्ट) संपल्यानंतर प्रचंड उकाडा आणि घामामुळे अंगाला खाज सुटल्याने तिघेही दुपारी १:३० ते २ वाजेच्या सुमारास मिलच्या मागे असलेल्या तलावात अंघोळीसाठी गेले.
हा तलाव सुमारे ६० बाय ४० फूट आकाराचा आणि तब्बल १५ ते २० फूट खोल आहे. अंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही एकापाठोपाठ एक खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडाले.
स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर
तलावाजवळ असलेल्या इतर मजुरांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून राईस मिल व्यवस्थापनाला माहिती दिली. घटनेची वार्ता मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते आणि रामटेकचे पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या साहाय्याने तलावात तातडीने शोधमोहीम हाती घेतली.
काही तासांच्या प्रयत्नांनंतर गुलशन कुमार मंडल आणि रुपेश कुमार शर्मा या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेद्वारे रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अंधार पडल्यामुळे तिसरा मजूर मनीष कुमार मंडल याचा शोध थांबविण्यात आला असून, रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या घटनेमुळे कामगार वर्गात हळहळ व्यक्त होत असून रामटेक पोलीस पुढील तपास करत आहेत.

