मुंडीपार खुनाचा २४ तासांत छडा: जादूटोण्याच्या संशयातून इसमाची हत्या दोन आरोपींसह दोन अल्पवयीन ताब्यात
Ndiगंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंडीपार (एमआयडीसी) परिसरात घडलेल्या गंभीर खुनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) गोंदियाच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावला आहे. जादूटोण्याच्या संशयातून हा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंडीपार येथील रहिवासी रविशंकर उदेलाल रहांगडाले (वय ५८ वर्षे) हे २२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे पावणेआठच्या सुमारास व्यंकटेश राईस मिलमध्ये रात्रपाळीच्या कामासाठी मोटारसायकलने जात होते. दरम्यान, एमआयडीसी रस्त्यावरील चमडा फॅक्ट्रीजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून डोक्यावर वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी मृतकाचा मुलगा विक्की रहांगडाले यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात पथकाने तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहितीदाराकडून पथकाला माहिती मिळाली की, गावात मृतक रवीशंकर हे जादूटोणा करत असल्याचा संशय होता आणि त्यावरून काहींचा त्यांच्यावर तीव्र राग होता. या माहितीच्या आधारे संशयित कमलेश नेवारे (वय १९ वर्षे) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता कटाचा पर्दाफाश झाला.चौकशीत कमलेशने कबुली दिली की, त्याच्या घरातील दोन व्यक्तींचा मृत्यू तसेच नातेवाईक व ओळखीच्या लोकांचे आजारपण हे मृतक रवीशंकर यांच्या जादूटोण्यामुळेच झाले असल्याचा संशय त्यांना होता. याच रागातून कमलेश नेवारे, जितेंद्र कोहळे व दोन अल्पवयीन मुलांनी मिळून रवीशंकर यांच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणे २२ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी दुचाकीवरून रवीशंकर यांचा पाठलाग केला, चमडा फॅक्ट्रीजवळ त्यांना गाठून हातोड्याने व कुर्हाडीने डोक्यावर वार करून त्यांचा जागीच खून केला.पोलिसांनी याप्रकरणी आरोपी जितेंद्र कोहळे (वय ४५ वर्षे), कमलेश अशोक नेवारे (वय १९ वर्षे, दोघे रा. टॉवरटोली, मुंडीपार) यांना अटक केली असून, दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गंगाझरी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.सदर उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, गंगाझरीचे ठाणेदार सपोनि धीरज राजूरकर, सपोनि अमरदीप खडे, सपोनि जंगमवार, सायबर सेलचे सपोनि देविदास ठमके व दोन्ही पथकातील अंमलदारांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

