पूर्व विदर्भाच्या विकासाची ‘सुपरफास्ट एक्सप्रेस’! ४२ हजार कोटींच्या चार महामार्गांना प्रशासकीय मंजुरी
नागपूर-गोंदियासह ४६० किमींचे द्रुतगती महामार्ग उभारणार कृषी, खनिज व औद्योगिक विकासाला मिळणार गती
Vidarbha पूर्व विदर्भातील पायाभूत सुविधा आणि दळणवळणाला नवी दिशा देणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूर-गोंदिया, नागपूर-चंद्रपूर आणि भंडारा-गडचिरोली या प्रवेश नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) द्रुतगती महामार्गांसह नवेगाव मोरे-सूरजागड मार्गाच्या निधीला राज्य शासनाने अधिकृत प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सुमारे ४६० किलोमीटरहून अधिक लांबीच्या या चारही प्रकल्पांचा एकत्रित खर्च तब्बल ४२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, यामुळे विदर्भातील औद्योगिक, कृषी व खनिज वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे.सविस्तर वृत्त असे की, पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिजे आणि वनसंपत्तीने समृद्ध आहेत. या जिल्ह्यांमधील दुर्गम व आदिवासी भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि वाहतूक गतिमान करण्यासाठी हे चार महामार्ग गेमचेंजर ठरणार आहेत. हे सर्व महामार्ग ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ (MSRDC) मार्फत राबविण्यात येणार आहेत. प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी प्रत्येकी २४ वर्षांचा सवलत कालावधी (कन्सेशन पिरियड) निश्चित करण्यात आला असून, त्यात प्रत्यक्ष तीन वर्षांच्या बांधकाम कालावधीचा समावेश आहे.प्रकल्पनिहाय खर्चाचा आणि लांबीचा तपशील :नागपूर-गोंदिया महामार्ग (१६२.५७ किमी) : या मार्गाचा प्रत्यक्ष बांधकाम खर्च ८,०३३.३७ कोटी रुपये असून जीएसटीसह एकूण प्रकल्प खर्च १२,८७८.२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्रकल्पासाठी २० वर्षांच्या मुदतीचे १०,१४० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास आणि शासनाचे भागभांडवल म्हणून ४,५५२.०१ कोटी रुपये देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.नागपूर-चंद्रपूर महामार्ग (२०४.७९ किमी) : या सुधारित मार्गाचा प्रत्यक्ष बांधकाम खर्च ८,२२३.५९ कोटी रुपये असून विविध अनुषंगिक खर्चांसह प्रकल्पाला १६,३५४.५५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी १२,८८० कोटींचे कर्ज आणि ४,७२५.२६ कोटींच्या शासकीय भागभांडवलास मान्यता देण्यात आली आहे.भंडारा-गडचिरोली महामार्ग (९४.२४ किमी) : या मार्गाचा प्रत्यक्ष बांधकाम खर्च ५,९९५ कोटी रुपये असून प्रकल्पासाठी एकूण ९,६१०.६३ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.नवेगाव-सूरजागड मार्ग : गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नवेगाव-कोनसरी-मूलचेरा-हेदरी ते सूरजागड या मार्गासाठी ३,९५४.९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे लोहखनिज वाहतुकीला मोठा वेग येईल.कामांना गती देण्यासाठी स्वतंत्र ‘एसपीव्ही’ स्थापनप्रकल्पांचे कामकाज विनाअडथळा आणि जलदगतीने व्हावे यासाठी एमएसआरडीसीने तीन स्वतंत्र विशेष उद्देश वाहने (SPV) स्थापन केली आहेत. यामध्ये ‘एमएसआरडीसी नागपूर-गोंदिया लिमिटेड’, ‘एमएसआरडीसी नागपूर-चंद्रपूर लिमिटेड’ आणि ‘एमएसआरडीसी भंडारा-गडचिरोली लिमिटेड’ यांचा समावेश आहे. या महामार्गांमुळे विदर्भातील दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणार असून, स्थानिक पातळीवर नवे उद्योग आणि हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

