गोंदियात वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप : गरोदर मातेसह बाळाचा दुर्दैवी मृत्यू
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील धक्कादायक घटना : नातेवाईकांचा संताप; रक्ताच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याचा अधिष्ठात्यांचा दावा
गोंदिया : प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रसूतीसाठी संदर्भित करण्यात आलेल्या एका गरोदर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातील ‘बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात’ घडली. २० सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे आरोग्य वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच माय-लेकराचा बळी गेल्याचा गंभीर आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला आहे. पूजा फरकुंडे असे मृत पावलेल्या दुर्दैवी मातेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गरोदर माता पूजा फरकंडे या नियमित आरोग्य तपासणी व उपचार घेत होत्या. २० सप्टेंबर रोजी त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडी येथून त्यांना तातडीने गोंदिया येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात पाठविण्यात आले. बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीदरम्यान पूजा यांचे हिमोग्लोबिन अवघे ५ ग्रॅम असल्याचे सांगून त्यांना रक्त चढविण्यात आले. मात्र, रक्ताच्या तीव्र कमतरतेमुळे गर्भातील बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर प्रसूती करण्यात आली असता, पूजा यांची प्रकृती अत्यंत खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
‘तर तिला कोणते इंजेक्शन दिले?’ नातेवाईकांचा सवाल
या घटनेनंतर मृत पूजा यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर जोरदार आक्षेप घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बाई गंगाबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या माहितीत मोठी तफावत असल्याने संशय निर्माण झाला आहे. पूजाचे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आधी इंजेक्शन दिल्याचे सांगण्यात येत होते, मग तरीही रक्ताची पातळी का वाढली नाही? तिला नेमके कोणते इंजेक्शन देण्यात आले होते? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. वेळीच योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळाले असते तर माता व बालकाचे प्राण वाचू शकले असते, असा आरोप करत नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रक्ताच्या तीव्र कमतरतेमुळे मृत्यू : अधिष्ठाता
या संपूर्ण प्रकरणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. रुखमोडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, पूजा फरकंडे या प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडीकडून उपचार घेत होत्या. गरोदर असतानाच त्यांना रक्त वाढीसाठी योग्य उपचार व पोषक आहाराची गरज होती. त्या बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या शरीरात रक्ताची अत्यंत तीव्र कमतरता होती. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळेच गर्भात बाळाचा मृत्यू झाला आणि प्रसूतीनंतर महिलेचाही मृत्यू ओढवला, असा दावा अधिष्ठात्यांनी केला आहे.

