digital kranti : भजेपार ग्रा.पं. मध्ये डिजीटल युगाची क्रांती !
ग्रामपंचायतने केली विकासाची कामे; नागरिकांना दिलासा
सालेकसा (Gondia) : ग्रामपंचायतीची सुविधायुक्त आणि तेवढीच सुंदर इमारत. गावात जागोजागी दिसणारे सीसीटीव्ही, वायफाय संयंञ, स्वच्छ, सुंदर परिसर, वृक्ष संगोपन करीत हरितक्रांती जोपासली. वाचन संस्कृतीही कायम ठेवली. लोकसहभागातून आता गावाचा कायापालट होत असून, भजेपार गाव खर्या अर्थाने स्मार्ट होत आहे. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी गावातील प्रत्येक घराच्या दारावर डिजिटल नेम्पलेटवरील क्यूआर कोड स्कॅन करून घरबसल्या कर भरा आणि मोबाइलवर पावती मिळवा, असा नवा उपक्रम (digital kranti) राबविणारी ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी.
तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत भजेपार येथे नागरिकांना विविध सेवांचा लाभझटपट देण्यासाठी आधुनिक डिजीटल संसाधनांचा वापर होऊ लागला.ही ग्रामपंचायत खर्या अर्थाने डिजीटल स्मार्ट झाली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीची करवसुली अधिक गतिमान आणि पारदर्शक व्हावी, यासाठी डिजीटल ग्रामसॉफ्ट विकसित केले आहे. प्रत्येक कुटुंबाच्या दारावर डिजीटल नेमप्लेट लावण्यात आल्या आहेत. यातील क्यूआर कोड स्कॅन केल्यास मालमत्ता विवरणासह चालू कर, थकीत कर किती ते दर्शविते. दरम्यान, कर भरण्यासाठी युपीआय, गुगल पे, फोन पे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे मोबाइलवरून थेट पेमेंट करता येते. घरोघरी जाऊन करवसुली करण्याच्या जुन्या बुरसटलेल्या प्रणालीला फाटा देत ग्रामपंचायत कारभाराला आधुनिक डिजिटल उभारी ग्रामस्थांनी दिली. सेवाभावी उपक्रम, पर्यावरणसंवर्धन, जलसंवर्धन, आरोग्य, अध्यात्म, शिक्षण व क्रीडा क्षेत्रातही या (digital kranti) गावाला मोठे लौकिक प्राप्त झाले असून, कोटीच्या वर पुरस्कार प्राप्त करणारी ही तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे .
वेबसाइटवर इत्यंभूत माहिती : येथील ग्रामपंचायतीने स्वतंत्र वेबसाइट तयार केली असून www.gpbhajepar.in या संकेतस्थळावर गावाची भौगोलिक, सामाजिक आणि सर्वच प्रकारची माहिती उपलब्ध होत असून सीएसआर सेंटरमधून अनेक ऑनलाइन सुविधा पुरविल्या जात आहेत. ग्रामपंचायतसह शाळा अंगणवाडीही आयएसओ! : येथील ग्रामपंचायतसह चार अंगणवाडी केंद्र तथा दोन्ही जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, डिजीटल साधने उपलब्ध केली आहेत.
कमालीचा लोकसहभाग
महापुरुषांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या या गावात कमालीचा लोकसहभाग मिळत असून ग्रामविकासाला चालना मिळाली आहे. शाळा पेंटिंग, वाचनालय निर्मिती, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, गरजूंना मदत यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग व श्रमदानाची जोड मिळत असून, लाखोची कामे लोकवर्गणीतून झालेली आहेत, नव्हे होतही आहेत.
तीन ठिकाणी वायफाय सेवा : ग्रामपंचायत कार्यालय, वाचनालय आणि जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भजेपार येथे वायफाय सुविधा असून, याचा वापर ग्रामपंचायतची ऑनलाइन कामे, वाचनालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करणे आणि शालेय मुलांना ऑनलाइन अध्यापन व डिजीटल बोर्ड वापरासाठी होत आहे. त्यामुले नागरिकांना सुविधा प्राप्त झाली आहे.
६३ कॅमेर्यांची निगराणी
शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, धार्मिक ठिकाणे यासह संपूर्ण गावातील ठिकठिकाणी इनडोअर आऊटडोअर ६३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्व चौक निगराणीत असल्याने गैरप्रकारांवर आपोआप आळा बसला आहे.
०००००००००००

