LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

भद्रावतीत थरार; १६ हजारांचा वाद; दुचाकी अडवून भररस्त्यात हत्या!

नागमंदिर चौकातील घटना; काका-पुतण्याला ठोकल्या चार तासांत बेड्या

भद्रावती (चंद्रपूर) : अवघ्या १६ हजार रुपयांच्या वादातून शहरातील नागमंदिर चौकात बुधवारी (दि. २३) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका इसमाची भररस्त्यात दुचाकी अडवून मानेवर चाकूने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेने भद्रावती शहर सुन्न झाले आहे. उमदेव भावराव मेश्राम (४२, रा. देऊरवाडा) असे मृतकाचे नाव आहे. हत्येनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या काका-पुतण्याला पोलिसांनी अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या आहेत. श्रेयस पुल्ली (२५) आणि त्याचा काका प्रकाश पुल्ली (४५, दोघेही रा. ओंकार ले-आऊट, भद्रावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.सविस्तर असे की, मृतक उमदेव मेश्राम हे बुधवारी सकाळी आपल्या दुचाकीने (एमएच ३४ क्यू २५१३) खरा घेऊन परत येत असताना नागमंदिर चौकात मुख्य आरोपी श्रेयस पुल्ली याने त्यांना गाठले आणि गाडी अडवली. जुन्या १६ हजार रुपयांच्या व्यवहारावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वाद विकोपाला जाताच श्रेयसने खिशातील तीक्ष्ण चाकू काढून उमदेव यांच्या मानेवर सपासप वार केले. मान कापल्या गेल्याने उमदेव हे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच कोसळले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.दोन वर्षांपासून सुरू होता वादतपासानुसार, उमदेव हे पूर्वी प्रकाश पुल्ली यांच्याकडे स्लॅब बांधकामावर मजुरी करायचे. त्यांनी काम सोडल्यानंतर प्रकाश त्यांच्याकडे १६ हजार रुपयांची मागणी करत होता, तर उमदेव हे आपलेच पैसे असल्याचे सांगत होते. घटनेच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रकाशने उमदेव यांच्या घरी जाऊन पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.पलायनाचा डाव; पोलिसांची झेप हत्येनंतर श्रेयस फरार झाला, तर प्रकाशला पोलिसांनी तात्काळ घरातून ताब्यात घेतले. मुख्य आरोपी श्रेयस हा आंध्र प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना, भद्रावती पोलीस व चंद्रपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पडोली परिसरात त्याला पाठलाग करून उचलले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी संतोष बाकल व प्रभारी ठाणेदार सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या ४ तासांत आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *