LatestNewsगोंदियाविदर्भ

आदिवासींचा जनआक्रोश उपविभागीय कार्यालयावर धडकला

संयुक्त आदिवासी संघटनांचा एल्गार
१८ मागण्यांसाठी भव्य मोर्चा
देवरी :
उठ आदिवासी जागा हो, लढण्याचा धागा हो…’ आणि ‘जय सेवा – जय जोहार’ या गगनभेदी घोषणा देत आदिवासी समाजावरील अन्यायाविरोधात देवरी शहरात मंगळवारी (ता.२२) संयुक्त आदिवासी समाज संघटनांच्या वतीने विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील जिल्हा परिषद मैदानावरून निघालेला हा भव्य मोर्चा प्रमुख मार्गांवरून जात उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर धडकला. विविध १८ प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिवासी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले.
आदिवासींच्या हक्कांवर गदा आणणार्‍या प्रशासकीय धोरणांचा निषेध करण्यासाठी गोंडवाना गोंड समाज संघटन, आदिवासी हलबा/हलबी समाज संघटन, पूर्व गोंड आदिवासी समाज संघटन, कवर समाज संघटन, गोंड गोवारी कोया संघटन, आदिवासी कर्मचारी संघटन, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, गोंडवाना सेवा समिती उंदरी, राणी दुर्गावती सेवा समिती, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच आदिवासी विद्यार्थी संघ या सर्व संघटनांनी एकत्र येत या भव्य जनआक्रोश मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार आज २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जि.प.मैदानावर हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषा व फलक हाती घेऊन एकत्र आले. तिथून निघालेल्या मोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
भागी/देवरी येथील अनधिकृत बांधकामादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला २५ लाख रुपये व जखमींना ५ लाख रुपयांचे शासकीय अनुदान तात्काळ द्यावे, तसेच या प्रकरणी दोषी असलेले देवरीचे तहसीलदार, भागी व गोटाबोडीचे ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ एफआयआर दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय लक्ष्मण मानकर ट्रस्टसोबत ४९० वसतिगृहांबाबत झालेला वादग्रस्त करार रद्द करणे, आदिवासी विकास मंत्र्यांचा राजीनामा घेणे, कंत्राटी पद्धत बंद करून १२ हजार ५०० कोटींच्या कामांऐवजी सरळसेवा नोकरभरती सुरू करणे, बिंदू नामावली पूर्ववत करून ८ व्या क्रमांकावरून २ नंबरवर आणणे, बोगस आदिवासींना पाठीशी घालणार्‍या कर्मचार्‍यांची सखोल चौकशी करणे, वन्यजीव व वनक्षेत्रात स्थानिक आदिवासींना रोजगारात प्राधान्य देणे आणि प्रलंबित वनहक्क दाव्यांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी लावून धरण्यात आली. त्याचप्रमाणे आश्रमशाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दर्जा सुधारणे, ‘स्वयंम’ योजनेला आदिवासी महापुरुषांचे नाव देणे व पेसा क्षेत्रातील संस्थांमध्ये आरक्षण लागू करण्यासह १८ मागण्यांना घेवून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासी धडकले. दरम्यान मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. मागण्यांवर तातडीने ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला.
आठवडी बाजार, मोर्चा अन् पोलिसांची कसरत
मंगळवारी देवरी शहरात आठवडी बाजार असल्याने मोठी गर्दी होती. त्यातच हजारो आदिवासी बांधव एकवटून भव्य जनआक्रोश मोर्चा काढला. यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. जि.प.मैदान, मुख्य बाजारपेठ आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आल्याने मोर्चा शांततेत पार पडला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *