धानोराजवळ खासगी बस उलटून १८ प्रवासी जखमी, तिघे गंभीर
वृक्षामुळे टळली मोठी जीवितहानी; चालकाने मद्यप्राशन केल्याचा प्रवाशांचा आरोप
धानोरा (प्रतिनिधी) : धानोरा-मुरूमगाव मार्गावरील वडगावजवळ रविवारी (दि. २४) दुपारी १२:४५ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. दल्ली (छत्तीसगड) येथून गडचिरोलीकडे येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस (क्रमांक CG 08 M 0388) मध्ये चालक आणि वाहकासह एकूण ३६ प्रवासी प्रवास करत होते. वडगावजवळ अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याखाली उलटली. अपघातानंतर बसमध्ये प्रवाशांचा एकच चिखलार्ट आणि गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलीस, स्थानिक नागरिक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.
हे आहेत जखमी :
या अपघातात नीलकंठ वाडके (५८, मारोडा), चांदणी रामटेके (२३, तोरगाव) आणि चालक रवी चावरे (३५, दल्ली) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर कृष निमगडे, बंडू खोब्रागडे, मिस्टी नरोटे, चांदणी साहू, पंचराम पटेल, देवदास झगराह, उदय देवांगण, ललिता साहू, जानको पोया, लता नरोटे, भूपेंद्र साहू, गुलाबो पटेल, शेखर उईके, गोपीचंद कुणबी आणि प्रदीप गावडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
झाडाचा आधार अन… मोठी जीवितहानी टळली!
धानोरा-मुरूमगाव रस्ता अत्यंत खराब असल्याने सुदैवाने बसचा वेग कमी होता. तसेच, बस उलटल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाला अडकली. झाडाचा हा आधार मिळाल्यामुळे बस पूर्णपणे चक्काचूर झाली नाही, ज्यामुळे एक मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, बस चालकाने मद्यप्राशन केले होते, असा थेट आरोप बसमधील प्रवाशांनी केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

