चामोर्शीत काळाचा घाला: वास्तूपूजनाला जाताना लोडरची दुचाकीला भीषण धडक; २४ वर्षीय तरुण ठार!
दोन जण गंभीर जखमी; विनापरवाना लोडर चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चामोर्शी (२५ जून) : जावायाच्या घराच्या वास्तूपूजनाच्या आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वारांवर काळाने भीषण घाला घातला आहे. चामोर्शी शहरातील आष्टी-घोट टी पॉईंट येथील हनुमान मंदिराजवळ बँकहो लोडर आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. २४) सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास घडला. निखिल विजय देशमुख (वय २४, रा. फराडा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आनंदोत्सवाचे रूपांतर शोकांतिकेत!
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल हा आपले नातेवाईक विनोद देवाजी देशमुख (वय ५०, रा. फराडा) व संतोष बालाजी किनेकार (वय ४५, रा. चाकलपेठ) यांच्यासह दुचाकीने (क्र. एमएच ३३ एबी ३०५४) आष्टीमार्ग गोंडपिपरी येथे एका कौटुंबिक वास्तूपूजन कार्यक्रमासाठी जात होता. ते आष्टी-घोट टी पॉईंट परिसरातील हनुमान मंदिराजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या एका बँकहो लोडरने चामोर्शी शहराकडे हायवेच्या दिशेने अचानक वळण घेतले. याच दरम्यान लोडर आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
विनापरवाना चालवत होता लोडर!
अपघातास कारणीभूत असलेला लोडर चालक सुनील मुस्तफा अन्सारी (वय १८, रा. मुशहरी, बिहार) हा विनापरवाना लोडर चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे वाहन जयनगर येथील सैकत विकास गाईन यांच्या मालकीचे आहे. पोलिसांनी जेसीबी चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे. চामोर्शी शहरात मागील वर्षभरात अवजड वाहनांची रहदारी वाढल्याने सातत्याने अपघात होत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघातानंतर जखमी तिघांनाही तातडीने चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, निखिल देशमुख याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी गडचिरोली सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जखमी विनोद देशमुख आणि संतोष किनेकार यांच्यावर चामोर्शी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मृत निखिलच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून फराडा गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चामोर्शीचे पोलीस निरीक्षक दीपक ढोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे करत आहेत.


