जमिनीखाली लपवलेला नक्षलवाद्यांचा शस्त्रांस्त्र साठा जप्त; चिनी हॅन्ड ग्रेनेड आढळल्याने खळबळ!
बीजापूर येथील लंका पहाडी परिसरात सुरक्षा दलांची धडाकेबाज कारवाई चीननिर्मित बॉम्ब नक्षलवाद्यांपर्यंत कसे पोहोचले? तपास यंत्रणांकडून शोध सुरू
गडचिरोली/बीजापूर : छत्तीसगडमधील बस्तर विभागात राबवण्यात येत असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बीजापूर जिल्ह्यातील लंका पहाडी परिसरात जवानांनी जमिनीखाली पुरून ठेवलेला नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रांस्त्र साठा शोधून काढून जप्त केला आहे. या साठ्यामध्ये चीननिर्मित हॅन्ड ग्रेनेड (हातोबॉम्ब) आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले असून, आता या शस्त्रांच्या मुख्य स्रोताचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे.शोध मोहिमेदरम्यान जवानांना जमिनीखाली दडवून ठेवलेली एक रायफल, एक इन्सास रायफल, बंदूक, दोन ग्रेनेड लॉन्चर, मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे, विविध प्रकारच्या मॅगझिन आणि ग्रेनेडचे स्फोटक साहित्य मिळाले आहे.चीननिर्मित हॅन्ड ग्रेनेड नक्षलवाद्यांपर्यंत कसे पोहोचले आणि ते जंगलात कधी आणून लपवले गेले, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. यापूर्वी घडलेल्या नक्षली हिंसाचारात याचा वापर झाला होता का, यादृष्टीनेही चौकशी सुरू आहे. मात्र, या शस्त्रांच्या मुख्य स्रोताबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याआधी २०१३ च्या दरभा हल्याच्या तपासातही चिनी हॅन्ड ग्रेनेड मिळाल्याची माहिती समोर आली होती.शोध मोहीम अधिक तीव्रसप्टेंबर महिन्यात बीजापूर व लगतच्या परिसरात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्र साठे शोधण्याचे अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. घनदाट जंगल आणि दुर्गम डोंगरी भागात जमिनीखाली दडवलेला साठा शोधणे हे जवानांसाठी मोठे आव्हान आहे. गुप्त माहितीच्या आधारे श्वान पथक आणि स्फोटक शोधक पथकाच्या मदतीने हे शोध अभियान राबवले जात आहे.

