LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गोंदियाहून भंडाऱ्याकडे गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

मातोश्री लॉनसमोर पोलिसांची धडक कारवाई
१०० किलो गोमांसासह दुचाकी, ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त
तिरोडा : गोंदियावरून दुचाकीच्या माध्यमातून भंडाऱ्याच्या दिशेने बेकायदेशीरपणे नेली जाणारी गोमांसाची मोठी खेप तिरोडा पोलिसांनी सापळा रचून पकडली. या कारवाईत पोलिसांनी १०० किलो गोमांस आणि गुन्ह्यात वापरलेली ज्युपिटर मोपेड असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही धडक कारवाई रविवारी स्थानिक मातोश्री लॉनसमोर करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद इरफान मोहम्मद रफिक शेख (वय ३२, रा. रामनगर, गोंदिया) आणि अक्रम खान मिया खान पठाण (वय ४०, रा. मांगली, ता. लाखनी, जि. भंडारा) अशी आहेत.
सविस्तर वृत्त असे की, गोंदिया शहरातून एका दुचाकीवरून मोठ्या प्रमाणावर गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक तिरोडा मार्गे भंडारा जिल्ह्यात केली जात असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तिरोडा येथील मातोश्री लॉनसमोर मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, संशयितरीत्या येणाऱ्या ज्युपिटर मोपेडला थांबवून झडती घेतली असता, वाहनावर पोत्यांमध्ये भरून ठेवलेले सुमारे १०० किलो गोमांस मिळून आले.
पोलिसांनी तात्काळ १५ हजार रुपये किमतीचे १०० किलो गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ८० हजार रुपयांची ज्युपिटर मोपेड असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक मुंगळे, पोलीस हवालदार नामुर्ते, पोलीस शिपाई अख्तर शेख, मोहित चौधरी, कैलास ठाकरे व इंगळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दडस पाटील करीत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *