विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या (आयटक) वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व इतर प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (दि. ११) कडाक्याच्या उन्हात जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राज्य महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष मिलिंद गणवीर, जिल्हाध्यक्ष चत्रूघन लांजेवार, कार्यकारी अध्यक्ष महेंद्र कटरे आणि जिल्हा सचिव रवी किटे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाशी संबंधित २९ मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांना देण्यात आले. या मागण्यांमध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान प्राप्त झाल्यापासून एका आठवड्याच्या आत त्याचे वितरण करणे, कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचे काटेकोर पालन करणे, दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत किमान वेतन, भत्ते आणि भविष्य निर्वाह निधी (PF) जमा करणे, साप्ताहिक व वार्षिक पगारी रजा देणे आणि अपघात विमा लागू करणे या मुद्द्यांचा समावेश आहे. तसेच, शासन निर्णयानुसार पंचायत समिती स्तरावर वर्षातून ३ वेळा व जि. प. स्तरावर २ वेळा तक्रार निवारण समितीच्या सभा घेण्यात याव्यात आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी राज्य महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष मिलिंद गणवीर यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. येत्या ८ जूनपासून नागपूरमधील मुख्यमंत्री सचिवालयासमोर दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन करण्यात येणार असून, यात कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. आजच्या या धरणे आंदोलनात आयटकचे जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, महासंघाचे बुधराम बोपचे, ईश्वरदास भंडारी, विष्णू हत्तीमारे, महेंद्र भोयर, भाऊलाल कटंगकर, विनोद शहारे, कु. दिप्ती राणे, देवेंद्र मेश्राम, मनोज जनबंधू, गजेंद्र हिरवाणी, तुलसीदास चौधरी, लोमेश कुमार यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

