LatestNewsगोंदियाविदर्भ

जिल्ह्यात विजांचा कहर : शेतात वीज कोसळून मजुराचा मृत्यू, देवरीत पती-पत्नी जखमी

गोरेगाव तालुक्यातील गणखैरा शिवारात काळाचा घाला; जमनापूर येथे मध्यरात्री घराचे मोठे नुकसान, वृद्ध सासरे बचावले
गोंदिया :
जिल्ह्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसादरम्यान विजांच्या कडकडाटाने तांडव माजवले असून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला, तर एकाच घरातील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. गोरेगाव तालुक्यातील गणखैरा शिवारात शेतात काम करताना वीज कोसळल्याने ५८ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला; तर देवरी तालुक्यातील जमनापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री एका घरावर वीज कोसळून दाम्पत्य जखमी झाले असून घरातील साहित्याची मोठी नासधूस झाली आहे.
गणखैरा शिवारात शेतमजुरावर काळाचा घाला
गोरेगाव तालुक्यातील गणखैरा येथे शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. मृतकाचे नाव देवीलाल शिवलाल गौतम (वय ५८, रा. गणखैरा) असे आहे. देवीलाल गौतम हे नेहमीप्रमाणे शेतात काम करीत असताना अचानक ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. याच दरम्यान आकाशातून थेट त्यांच्या अंगावर वीज कोसळली. हा आघात इतका भीषण होता की, देवीलाल यांचा घटनास्थळावरच तडफडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गोरेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया येथील केटीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. या घटनेमुळे गणखैरा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
जमनापुरात मध्यरात्री घरावर कोसळली वीज; इलेक्ट्रॉनिक साहित्य भस्मसात
दुसऱ्या घटनेत, देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंडकेपार/गो. अंतर्गत येणाऱ्या जमनापूर येथे शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला. गावात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना सुकराम मनिराम टेकाम यांच्या घरावर अचानक वीज कोसळली. प्रचंड आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. या घटनेत घरात झोपलेले सुकराम टेकाम (५१) व त्यांच्या पत्नी मालन टेकाम (४८) हे दोघे भाजून जखमी झाले. सुदैवाने शेजारील खोलीत झोपलेले त्यांचे सासरे गणूलाल राजाराम सराटे (६८, रा. चांदलमेटा) हे बालंबाल बचावले.
वीज थेट इलेक्ट्रिकल वायरिंगमधून घरात शिरल्याचा प्राथमिक अंदाज असून घरातील मधल्या खोलीच्या जमिनीला मोठे खड्डे पडले आहेत. तसेच घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली आहेत. जखमी दाम्पत्याला तातडीने देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *