LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

खासदार प्रफुल पटेल यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या; तत्काळ निवारणाचे अधिकाऱ्यांना निर्देश

रामनगर येथील निवासस्थानी नागरिकांसह पदाधिकाऱ्यांची गर्दी प्रशासकीय अडचणी दूर करण्यावर भर

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी सोमवारी रामनगर बगीचा येथील आपल्या निवासस्थानी जनतेचा दरबार भरवून नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विविध अडीअडचणी व समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेत त्यांनी संबंधित विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत सर्व प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले.खासदार प्रफुल पटेल गोंदिया दौऱ्यावर असताना त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी सामान्य जनतेसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावपातळीवरील विकासकामे, रस्ते, वीज, पाणीपुरवठा तसेच विविध शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रलंबित प्रशासकीय अडचणींचा पाढा खासदार पटेल यांच्यासमोर वाचला. जनतेच्या हिताशी निगडित असलेल्या सर्व समस्या समजून घेत पटेल यांनी अनेक प्रकरणांत जागेवरच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देत नागरिकांना दिलासा दिला. तसेच जनहिताच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या थेट भेटीगाठी घेऊन अडचणी सोडविण्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *